
सामना ऑनलाईन। पुणे
नाशिकमध्ये भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातल्याची घटना ताजी असतानाच पुण्यातही भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट असल्याचे समोर आले आहे. दररोज जवळपास तीस पुणेकरांचा भटकी कुत्री चावा घेतात. अशी धक्कादायक माहिती पुणे महापालिकेनं दिलेल्या आकडेवारीवरून समोर आली आहे. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळं महापालिकेनं भटक्या कुत्र्यांच्या विरोधातील कारवाई तीव्र केलीय. भटकी कुत्री पकडून त्यांची नसबंदी आणि लसीकरण करण्यात येत आहे. मागील तीन महिन्यात अडीच हजार कुत्र्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
महापालिकेच्या अंदाजानुसार पुण्यात दीड लाख भटकी कुत्री आहेत. या भटक्या कुत्र्यांनी दररोज साधारण तीस या सरासरीने २०१७ मध्ये १० हजार ३४० पुणेकरांचा चावा घेतला आहे. तर, जानेवारी ते मे २०१८ या पाच महिन्यात ४ हजार ६४१ पुणेकरांचा लचका तोडला आहे. अगदी, पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारातच भटक्या कुत्र्यांनी पोलीस आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केला होता. भटक्या कुत्र्यांच्या या वाढत्या हल्ल्यांमुळं हा विषय महापालिकेच्या सभेतही गाजला. त्यावर महापालिकेनं भटक्या कुत्र्यांवरील कारवाई देखील तीव्र केलीय.
महापालिकेनं २०१७- २०१८ या वर्षात ११ हजार ७०७ भटक्या कुत्र्यांची नसबंदी करुन त्यांना अॅन्टी रेबीज लस देण्यात आली आहे. तर, एप्रिल ते जुन २०१८ या तीन महिन्यात २ हजार ३२२ भटक्या कुत्र्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. नसबंदी आणि लसीकरण केलेल्या कुत्र्यांच्या गळ्यात हिरव्या रंगाचे पट्टे बांधण्यात येत आहेत. यामुळे कुत्रा चावला आणि त्याच्या गळ्यात हा पट्टा असला तर , घाबरुन जाण्याचे कारण नाही. कारण त्याचं अँन्टीरेबीज लसीकरण झालेलं आहे.
महापालिका मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांची नसबंदी करत आहे. तरीही भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतेय आणि त्यांनी केलेल्या हल्ल्यांची संख्या देखील वाढतेय. त्यासाठी महापालिका भटक्या कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरणाची केंद्र वाढवणार आहे. मात्र, भटक्या कुत्र्यांची संख्या पाहता ही समस्या लवकर संपण्याची शक्यता नाही. त्यामुळं पुणेकरांनी सध्या सावध राहीलेलंच बरं.






























































