806 जणांवर तडीपारी प्रस्तावित; गणेशोत्सवात पोलिस ऍक्शन मोडवर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
गणेशोत्सवात कुठलाही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून कठोर उपाय योजना करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिस प्रशासनाने तब्बल 2881 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. यात 26 ते 28 सप्टेंबर असे तीन दिवस 806 जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली.
गेल्या काही महिन्यात नगर शहरासह जिल्हाभरात जातीय तणाव निर्माण होणार्‍या घटना घडल्या आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गणेशोत्सवात राजकीय शक्ती प्रदर्शनही मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिस दलाने गणेशोत्सवातील शेवटच्या तीन दिवसात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कठोर पावले उचलली आहेत.
कलम 107 अंतर्गत 774 जणांवर, कलम 110 अंतर्गत 149 जणांवर, कलम 144(2) अंतर्गत 732 जणांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच कलम 149 अंतर्गत तब्बल 1059 जणांना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावण्यात येणार आहेत. मुंबई दारू विक्री प्रतिबंध कायद्यानुसार 81 दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय 12 सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव देण्यात आले आहेत. त्यातील तीन मंजूर करण्यात आले आहेत.दरम्यान, पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. 122 अधिकारी, 1725 कर्मचारी, शीघ्र कृती दल, राज्य राखीव पोलिस दलाचे पथक, स्ट्राईकिंग फोर्स, 1650 होमगार्ड असा जिल्ह्यातील बंदोबस्त आहे. याशिवाय जिल्ह्याबाहेरून 16 अधिकारी, 250 कर्मचारी, राज्य राखीव दल व शीघ्र कृती दलाची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे, असे अपर अधीक्षक प्रशांत खैरे यांनी सांगितले.