मुलीच्या मागे बसू दिलं नाही म्हणून विद्यार्थ्यावर चाकूहल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोलकाता

तरुणांमध्ये क्षुल्लक कारणांवरून हिंसेचं प्रमाण वाढत असल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. कोलकात्यातही असाच प्रकार घडला असून मुलीच्या मागच्या सीटवर बसू दिलं नाही म्हणून एका विद्यार्थ्याने दुसऱ्यावर चाकू हल्ला केला आहे.

पीडित विद्यार्थी हा दहावीचा विद्यार्थी आहे. सोमवारी संध्याकाळी पावणे पाच वाजताशाळा सुटल्यानंतर तो बसमधून घरी जात होता. तेव्हा अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने त्याला त्याच्या जागेवरून उठायला सांगितलं. पीडित विद्यार्थी जिथे बसला होता, त्याच्या पुढे एक मुलगी बसली होती. अकरावीतील विद्यार्थ्याला तिच्या मागे बसायचं होतं, मात्र पीडित मुलाने त्याला नकार दिला. नकारामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि वादाचं रुपांतर मारहाणीत झालं. तिथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केले. बस ट्रॅफिकमध्ये थांबली होती. तेव्हा अकरावीचा विद्यार्थी बसमधून खाली उतरला आणि त्याने तेथील एका स्टॉलवरून चाकू आणला. संतापाच्या भरात त्याने पीडित मुलावर सपासप वार केले.

त्यानंतर आजूबाजूच्या विद्यार्थ्यांनी, चालक आणि क्लिनरने कसंबसं आरोपी मुलाला रोखलं आणि पीडित मुलाला त्वरीत रुग्णालयात दाखल केलं. तूर्तास कोलकाता येथील डमडम रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं आहे. आरोपी विद्यार्थ्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.