निकाल वाढला तरीही अकरावी प्रवेशाकडे विद्यार्थ्यांची पाठ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंतर्गत मूल्यमापनामुळे दहावीच्या निकालात वाढ झाली असली तरी हजारो विद्यार्थ्यांनी अकरावी ऑनलाइन प्रवेशाकडे पाठ फिरविल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीनंतर समोर आले आहे. वर्ष 2020 च्या तुलनेत यंदा ऑनलाइन अर्ज करणाऱया विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 40 हजारांनी घटली आहे. गेल्या वर्षी अकरावी प्रवेशासाठी कॉलेज पसंतीक्रम भरून गुणवत्ता यादीची वाट पाहणाऱया मुंबई विभागातील विद्यार्थ्यांची संख्या 2 लाख 42 हजारांच्या घरात होती. यंदा मात्र अर्जांची पडताळणी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 2 लाख 2 हजार 58 विद्यार्थ्यांनी कॉलेज पसंतीक्रम भरले आहेत.

कोरोनामुळे देशभरात दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा झालेल्या नाहीत. नववी आणि दहावीतील अभ्यासावर केलेल्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे दहावीचा निकाल यंदा 99.5 टक्के लागला तर आयसीएसई बोर्डाचा राज्याचा निकाल 100 टक्के त्याचबरोबर सीबीएसई पुणे विभागाचा निकालही 10 टक्के लागला. दरवर्षीपेक्षा यंदा निकालाची टक्केवारी वाढूनही अकरावी प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांची संख्या का घटली असा प्रश्न कॉलेजांसमोर उभा राहिला आहे. कोरोना निर्बंधांमुळे आर्थिक संकटात सापडलेली अनेक कुटुंबे मुंबईहून त्यांच्या मूळ गावी परतली आहेत. तसेच मुंबईतील शाळा-महाविद्यालये अद्याप सुरू झाली नाहीत तर दुसरीकडे गावाकडील वर्ग भरत आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणातील अडथळे पाहता अनेक विद्यार्थी गावाकडील कॉलेजमध्येच शिक्षण घेत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीमुळे काही विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणही थांबल्याची शक्यता आहे.

ऑनलाइन अर्जात झालेली घट या विषयाकडे शिक्षण विभागाने गंभीरपणे पाहण्याची गरज आहे. तसेच त्यामागच्या कारणांचा अभ्यास होऊन विद्यार्थी शिक्षणप्रवाहाबाहेर जात असतील तर त्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.

 

अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी अर्ज करणारे विद्यार्थी (मुंबई)

             एसएससी      सीबीएसई     आयसीएसई       आयजीसीएसई

2020        2.21         7708        11110              1300

2021        1.83         6363       10050               1220

              (लाख)