सोलापूर महापालिका शिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या विविध माध्यमांच्या 64 पैकी 58 शाळांना ‘समग्र शिक्षा’ अंतर्गत मोफत पाठ्य़पुस्तके वाटप करण्यात येत आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी उपस्थित विद्यार्थ्यांना या मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात
येणार आहे.
शासनाच्या ‘समग्र शिक्षा योजने’अंतर्गत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तके वाटप करण्यात येणार आहेत. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे बीटनिहाय एकात्मिक पाठय़पुस्तक वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.
सोलापुरातील जोड बसवण्णा चौक येथील मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक 6 येथे या पुस्तकांचे वाटप करण्यात येत आहे. शहरातील सर्व महापालिका शाळा, खासगी, अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना ही पुस्तके दिली जाणार आहेत. दरम्यान, संबंधित मुख्याध्यापक किंवा शिक्षक प्रतिनिधींनी मागणीप्रमाणे आवश्यक ती पुस्तके ताब्यात घ्यावीत, अशा लेखी सूचना महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी संजय जाकीर यांनी यापूर्वीच दिल्या आहेत. महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी संजय जाकीर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजपूर्वक शाळांना पुस्तके वाटप करण्यात येत आहेत.
23000 पुस्तकांचे वाटप
‘समग्र शिक्षा योजने’अंतर्गत महापालिका शिक्षण विभागाकडून एकूण 2 लाख 92 हजार 902 प्रतिपाठ्य़पुस्तकांची मागणी करण्यात आली. त्यापैकी 2 लाख 91 हजार 162 प्रतिपाठ्य़पुस्तके प्राप्त झाली आहेत. 99.40 टक्के पुस्तके उपलब्ध झाली आहेत. महापालिका मराठी, उर्दू, इंग्लिश माध्यमांतील 64 शाळांपैकी आतापर्यंत 58 शाळांना 23 हजार 100 पुस्तके वाटप करण्यात आली आहेत. उर्वरित शाळांना 7 जूनपर्यंत पुस्तके देण्यात येणार आहेत.