मराठी भाषेला किंमत नाही कारण मराठीत पैसा नाही, सुबोध भावेंनी मांडलं परखड मत

2318

मराठी भाषा ही परंपरेने अत्यंत समृद्ध अशी भाषा आहे. तरीही मराठीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर किंमत नाही. याचं कारण मराठी भाषेत पैसा नाही, असं परखड मत सुप्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक सुबोध भावे यांनी व्यक्त केलं आहे.

सुबोध भावे हे अभिनय आणि दिग्दर्शनासह त्यांच्या रोखठोक आणि तार्किक शैलीसाठीही ओळखले जातात. नुकतंच त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधत मराठी भाषेच्या सद्यस्थितीचा लेखाजोखा मांडला. मराठी भाषा आणि तिच्या अस्तित्वाचा प्रश्न सध्या भेडसावताना दिसत आहे. प्रादेशिक भाषा म्हणून मराठी भाषेला का किंमत दिली जात नाही, याचा समाचार त्यांनी त्यांच्या शैलीत घेतला. बांगलादेश इथे झालेल्या एका आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातील अनुभवांविषयी त्यांनी या फेसबुक लाईव्हमध्ये सविस्तरपणे सांगितलं.

सुबोध भावे म्हणाले की, हिंदुस्थानातल्या प्रादेशिक भाषांपैकी मराठी ही एक प्रमुख भाषा आहे. जागतिक स्तरावर सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये 17व्या क्रमांकावर मराठी आहे. देशपातळीवरच्या विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक चळवळी, सामाजिक सुधारणा यांची रुजुवात मराठी भाषेत झालेली आहे. मराठी चित्रपट- नाटक हे आशयघन असतात. तरीही आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठीचा म्हणावा तितका सन्मान का केला जात नाही, या प्रश्नाचं उत्तर आर्थिक संपन्नता नसणं हे आहे. एखादी भाषा समृद्ध होण्यामागे आर्थिक संपन्नता हा घटक एक खूप निर्णायक भूमिका बजावतो. त्यामुळे मराठीला किंमत नाही, कारण मराठी भाषेत पैसा नाही, असं मनोगत सुबोध यांनी व्यक्त केलं आहे.

मराठी चित्रपट आणि नाटक यांच्या सद्यस्थितीवरही सुबोध यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, हिंदी किंवा इतर कोणतीही प्रादेशिक भाषा यांच्यातील चित्रपटांना कुणाचाही विरोध नाही. पण, हिंदी चित्रपट देशपातळीवर प्रदर्शित केले जातात. तशी मराठीसारख्या प्रादेशिक भाषांची स्थिती नाही. मराठी भाषेचा चित्रपट जर महाराष्ट्रातच पोहोचू शकत नसेल, तर त्याला आर्थिक संपन्नता कुठून मिळणार, असा रोकडा सवाल त्यांनी प्रेक्षकांना केला आहे. मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी वैयक्तिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक असे सर्व बाजूंनी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे मराठी भाषिकांनी आता या कामी पुढाकार घ्यायला हवा, असं आवाहनही सुबोध भावे यांनी केलं आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या