
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
विविध आरोप असल्यामुळे मोदी सरकारने आयकर विभागातील काही अधिकाऱ्यांना सक्तीने सेवानिवृत्ती घ्यायला लावली आहे. यामध्ये एस.के.श्रीवास्तव यांचाही समावेश आहे. याच श्रीवास्तव यांच्या पाठीशी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी उभे रहायचे ठरवले आहे. स्वामी यांनी एक ट्विट केले असून यामध्ये त्यांनी आपण याबाबत पंतप्रधानांना पत्र लिहणार असल्याचे म्हटले आहे.
I am taking up the case of S K Srivastava I-T Commissioner who was investigating NDTV, since there is no new substantive case against him and Mdm Sitharaman has relied on PC time filed bogus cases, to terminate his services possibly to favour NDTV.First I will write to PM.
— Subramanian Swamy (@Swamy39) June 11, 2019
निर्मला सीतारमण यांनी अर्थखात्याचा भार स्वीकारल्यानंतर आयकर विभागातील वादग्रस्त अधिकाऱ्यांना सक्तीने सेवानिवृत्ती घेण्यास भाग पाडले. नियम 56 अंतर्गत केंद्र सरकारने 12 अधिकाऱ्यांना ही कारवाई केली. भ्रष्टाचार, लैंगिक शोषण, बेहिशोबी मालमत्ता जमा करणे असे गंभीर आरोप असलेल्या अधिकाऱ्यांविरोधात हा कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. स्वामी यांना मात्र श्रीवास्तव यांना सेवानिवृत्त करण्यामागे षडयंत्र असल्याचा संशय आहे. श्रीवास्तव हे NDTV या वृत्तवाहिनीने केलेल्या आयकर नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी चौकशी करत होते. त्यांच्याविरोधात जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते पी.चिदंबरम हे अर्थमंत्री असताना दाखल करण्यात आले होते. श्रीवास्तव यांच्याविरोधात नवीन कोणताही गुन्हा नोंद झालेला नसून निर्मला सीतारमण यांनी चिदंबरम यांच्या काळातील गुन्ह्यांच्या आधारे श्रीवास्तव यांच्यावर कारवाई केली आहे असा आरोप स्वामी यांनी केला आहे.



























































