अन्ननलिकेत अडकलेली कडूलिंबाची काडी एंडोस्कोपी द्वारे काढण्यात यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी । नगर

पाथर्डी तालुक्यातील एका ५५ वर्षीय व्यक्तीच्या घशात अडकलेली कडूलिंबाची काडी काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. नगरमध्ये या व्यक्तीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. सकाळी दात घासताना अनावधानाने कडूलिंबाची काडी या व्यक्तीने गिळली होती. नगरमधील गॅलॅक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड एंडोस्कोपी सेंटरमधील डॉ. संदीप काळोखे यांनी या व्यक्तीच्या घशात १५ दिवसांपासून अडकून असलेली कडूलिंबाची काडी यशस्वीपणे बाहेर काढली. बाहेर काढलेली ही कडूलिंबाची काडी तब्बल २२.५ सेंटीमीटर इतक्या लांबीची होती. अत्याधुनिक एंडोस्कोपी तंत्रज्ञान व कौशल्य यामुळे या व्यक्तीस अक्षरश: नवीन जीवनच मिळाले.

कडूलिंबाच्या काडीने दात घासताना त्या व्यक्तीच्या अन्ननलिकेत काडी गेली होती. त्यामुळे त्यांना छाती दुखणे, खोकला येणे, जेवताना अडचण, असा त्रास होत असे. एंडोस्कोपीमध्ये त्यांच्या अन्ननलिकेत काडी अडकल्याचे आढळून आले. त्यानंतर एंडोस्कोपी वापरून ती काडी काढण्यात यश मिळवले. सुदैवाने अन्ननलिकेला गंभीर इजा न होताच निदान करण्यात आल्याचे डॉ. काळोखे यांनी सांगितले.