
पूर्व उपनगराच्या पाणीपुरवठय़ात सुधारणा करण्यासाठी पालिका ‘टोटल स्टेशन सर्वेक्षण’ करीत असून आवश्यकतेनुसार नव्या यंत्रणांची तातडीने उभारणी करण्यात येणार आहे. यामुळे लवकरच पूर्व उपनगरवासीयांचा पाणीप्रश्न सुटणार असून त्यांना मुबलक पाणी मिळणार आहे. या कामात मानखुर्द, देवनार परिसरात नव्या शोषण टाक्या, साठवण टाक्या बनविणे, उदंचन व्यवस्था करणे अशी कामे करण्यात येणार आहेत.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठय़ाच्या गोंधळामुळे नागरिकांना मोठय़ा प्रमाणात मनःस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत स्थायी समितीत सदस्यांनी प्रचंड संताप व्यक्त करीत प्रशासनाला धारेवर धरले होते. यावेळी प्रशासनाकडून जुनी यंत्रणा आणि वाढलेल्या मागणीमुळे पुरवठय़ात असमानता आल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले होते. यामध्ये आता पूर्व उपनगरात मानखुर्द, देवनार परिसरातील कस्टम कॉलनी रोड, चिता कॅम्प, दत्त नगर भागातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी शोषण टाक्या बांधणे, जलवाहीन्यांचे जाळे टाकणे उदंचन व्यवस्था करणे अशी कामे करण्यात येणार आहेत.
असे होणार काम
मुंबईत रोज 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो, मात्र वितरण व्यवस्थेच्या टोकाला असलेल्या अनेक भागांत पाण्याचा तुटवडा जाणवतो. काही भागांत मोठय़ा संख्येने पुनर्विकास आणि विकास झाल्याने लोकसंख्या वाढली आहे. मात्र पाणीपुरवठय़ात अपेक्षित वाढ झालेली नाही. या भागातील पाणीपुरवठय़ाची समस्या जाणवते. त्यामुळे या समस्या सोडवण्यासाठी टोटल स्टेशन सर्वेक्षणामुळे कोणत्या ठिकाणी शोषण टाक्या बनवायच्या, कोणत्या ठिकाणी जलवाहिन्या टाकायच्या याची शास्त्रोक्त माहिती मिळणार आहे.
























































