…तर साखर कडू होईल! साखर परिषदेत मान्यवरांचे एकमत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, पुणे

राज्यात साखरेचे उत्पादन जास्त होत आहे. त्यामुळे उसापासून साखरेऐवजी पर्यायी उत्पादनाचा विचार साखर कारखान्यांनी वेळीच करावा. उसापासून इथेनॉलनिर्मितीचा व्यवसाय भविष्यात शेतकऱयांना आणि ऊस उत्पादक, कारखानदारांसाठी फायदेशीर ठरणारा आहे. त्यामुळे त्याचा विचार करावा. केवळ साखर तयार करीत राहिलात तर भविष्यात साखरेतून हातात काहीच पडणार नाही. साखर कडू होईल, असे मत साखर परिषदेत मान्यवरांनी व्यक्त केले.

राज्य सहकारी बँकेच्या वतीने ‘साखर परिषद 20-20’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सहकारमंत्री सुभाष देशमुख, राज्य बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्यासह राज्यातील साखर कारखान्यांचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

उसापासून साखरेऐवजी पर्यायी उत्पादनाचा विचार केला पाहिजे. इथेनॉलनिर्मिती हा दीर्घकालीन पर्याय आहे, असे केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी म्हणाले. शरद पवार म्हणाले, कारखान्यांकडे मोठय़ा प्रमाणात साखर गोदामांमध्ये पडून आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असताना अशा वेळी साखर कारखान्यांना आणि शेतकऱयांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकार घेईल, अशी आशा आहे. दरम्यान, राज्य सहकारी बँकेने मुख्यमंत्री निधीला पाच कोटींचा धनादेश दिला.

जास्त साखरेमुळे बाजारात मागणी कमी झाली आहे. साखर उत्पादक आणि कारखानदार अडचणीच्या काळातून जात आहेत. त्यामुळे पुढील वर्षी राज्यात उसाचे उत्पादन 40 ते 50 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे.’
– शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी गेल्या दोन वर्षांत अनेक साखर कारखान्यांनी पैसे दिले नाहीत. मुख्यमंत्री निधी आपल्या सर्वांचे सामाजिक दायित्व आहे. त्यासाठीही साखर कारखान्यांनी आपला वाटा उचलावा आणि हा निधी लवकरात लवकर द्यावा.’
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

‘साखरेच्या जादा उत्पादनामुळे साखर कारखाने अडचणीत आले आहेत. वर्षानुवर्षे हा प्रश्न येताच त्यावर साखर निर्यात करणे हा एकमेव उपाय नाही. ब्राझीलमध्ये सध्या 22 रुपये किलोने साखर मिळत आहे. अशावेळी हिंदुस्थानची 32 रुपये किलो साखर कोण घेणार?’
– नितीन गडकरी, केंद्रीय वाहतूकमंत्री