
शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रात जास्तीचे उत्पन्न घेण्यासाठी कारखाना प्रोत्साहन योजना व्हीएसआयच्या मदतीने सुरू करणार असल्याचे प्रतिपादन लोकनेते सुंदरराव सोळंके साखर कारखान्याचे अध्यक्ष धैर्यशील सोळंके यांनी केले.
बुधवारी माजलगाव मतदारसंघातील तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके साखर कारखान्याच्या 19-20 च्या गाळप हंगामाच्या सांगता समारंभात बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष वसंतराव घाटूळ व संचालक मंडळाची तसेच कार्यकारी संचालक एम डी घोरपडे, कारखाना सचिव सुरेश लगड यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सोळंके म्हणाले की, 19-20 च्या हंगामात तीन लाख मे टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असताना अपेक्षेपेक्षा जास्त गाळप सर्वांच्या सहकार्याने झाले,माझ्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी टाकण्यात आली असताना हा हंगाम यशस्वी झाला याचा आनंद आहे, कारखानदारीत २८ वर्षांपासून सलग हंगाम पार पाडणारा कारखाना असा नावलौकिक या कारखान्याने मिळवलेला आहे,पुढचा हंगाम मोठा आहे, पुढच्यावेळी १० लाख मे टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात येणार आहे, पाच हजार मे टन गाळप क्षमतेप्रमाणे दररोज करण्यात येणार, माझ्या शेतीप्रमाणे कारखान्याचे काम करत शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार तसेच भविष्यात संस्थेचे उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीने काम करू अशी ग्वाही त्यांनी दिली.






























































