सुप्रीम कोर्टाबाहेर दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, 40 टक्के भाजल्याने रुग्णालयात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वोच्च न्यायालयाच्या बाहेर दोन व्यक्तींनी आज आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यात एक महिला, तर एक पुरुष आहे. दोघेही 40 टक्के भाजले असून त्यांना उपचारासाठी राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या ‘डी’ गेटबाहेर ही घटना घडली. आत्मदहन करणाऱया महिलेने उत्तर प्रदेशातील घोसी येथील खासदार अतुल राय यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप केला आहे. यंत्रणेकडे दाद मागूनही आपल्याला न्याय मिळालेला नाही असे त्या महिलेचे म्हणणे आहे. आत्मदहन करणारा पुरुष हा या प्रकरणातील साक्षीदार आहे. स्वतःला जाळून घेण्यापूर्वी या दोघांनी सोशल मीडियावर लाइव्ह केले होते. न्यायालयाच्या आत प्रवेश करण्याचा प्रयत्नही या दोघांनी केला होता; परंतु आवश्यक ओळखपत्र नसल्याने त्यांना सुरक्षारक्षकांनी मज्जाव केला.