
सामना प्रतिनिधी । भोर
सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली. तर या महिलेच्या अडीच वर्षांच्या मुलीचाही मृतदेह विहिरीत आढळल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पतीसह तिघांना राजगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माहेरच्या नातेवाईकांनी मायलेकीचा घातपात केल्याचा आरोप करून आरोपींना अटक करण्याची मागणी करत पोलीस ठाण्यासमोर ठाण मांडले.
नीलम मनोज थिटे (वय ३०, रा. हातवे, भिलारवाडी, ता. भोर) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे, तर तिची अडीच वर्षांची मुलगी शामवी मनोज थिटे हिचा मृतदेह शेतामधील विहिरीत आढळून आला. याप्रकरणी पती मनोज दिनकर थिटे, सासू रत्नमाला दिनकर थिटे, नणंद जयश्री दिनकर थिटे अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी अकस्मात आणि आत्महत्या असे दोन गुन्हे दाखल केले आहेत. पती, सासू आणि नणंद यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद नीलमचे वडील दिलीप तळेकर यांनी दिली आहे.
राजगड पोलीस ठाण्याचे अंमलदार बाबा कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलमच्या सासरच्या शेतामधील बंद घराचा दरवाजा उघडा असल्याने शेजारील शशिकांत थिटे यांनी घरात पाहिले असता नीलम ही मोठमोठ्याने श्वास घेताना आढळून आली. यावेळी नीलमला उपचारासाठी नसरापूर येथील खासगी रुग्णालयात नेले असता मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर शेत घरापासून काही अंतरावर असणाऱ्या विहिरीत शामवीचा मृतदेह आढळून आला.
नीलम आणि शामवी यांचा सासरच्यांनीच घातपात केला आहे. नीलम ही प्रतिकारक होती. ती आत्महत्या करूच शकत नाही. कारण सासरच्या छळाबाबत तिने यापूर्वी पोलीस ठाण्यात स्वत: धाव घेतली होती. पोलिसांनी सर्व बाबी तपासल्या तर दोषींना शिक्षा मिळेल. – दिलीप तळेकर, नीलमचे वडील
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, दोन्ही घटनेच्या तपासामध्ये अधिक काही बाबी आढळल्यास पुढील कारवाई करण्यात येईल. – पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, राजगड पोलीस ठाणे, नसरापूर.






























































