विकासासाठी आम्हीकोणा बरोबरही जाऊ शकतो – खा. डॉ. सुजय विखे यांची भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sujay-vikhe-patil

आम्ही राजकारण करत नाही, नगर दक्षिणेचा व नगर शहराच्या विकासासाठी आम्ही कुठल्याही स्तरावर जाऊन कोणाशीही आघाडी करायला तयार आहोत. ही आघाडी आमच्या स्वार्थासाठी नाही, जनतेच्या हितासाठी आहे एवढेच मला यातून सांगायचं आहे, असे वक्तव्य खासदार डॉ सुजय विखे यांनी रविवारी केले. महानगरपालिकेच्या माध्यमातून अडीच वर्षांमध्ये केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी माऊली सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप , भाजप माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शहराध्यक्ष भय्या गंधे, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, आदी उपस्थित होते.

खासदार विखे म्हणाले की , शहरात अनेक विकास कामे करताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र त्यावर मात करून आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला. महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता असताना त्या वेळेला आम्ही राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला ही वस्तुस्थिती आहे, आम्ही अडीच वर्षांच्या कार्यकाळामध्ये कामे केली, ती आता जनतेसमोर मांडण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. नगर शहराचे प्रलंबित असलेली अमृत योजना असेच भुयारी गटार योजना, नगर शहरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला उड्डाणपुलाचा विषय आम्ही आमच्या कार्यकाळामध्ये मार्गी लावू शकलो, असेही ते म्हणाले. अमृत योजनेचे काम झाल्यामुळे नगर शहराला 24 तास पाणी आता मिळणार आहे. लवकरच ही योजना पूर्णत्वाला जाईल असे ते म्हणाले. या योजनेचे साधारण 90 टक्के काम पूर्ण झाले आहे, या योजनेअंतर्गत 36 किलोमीटर पाइप लाईन टाकायची होती ती टाकून उद्घाटन मागच्या आठवड्यात केलं होतं. आता 90 ते 95 टक्के काम पूर्ण झाले. शेतकऱ्यांचा विरोध होता,त्या शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्या ठिकाणी काम पूर्ण केले आहे. रेल्वे विभागाच्या अडथळा होता तो सुद्धा दूर करून अमृत पाणीपुरवठा योजना मार्गी लावली. पुढच्या सहा महिन्यात ही योजना पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यामुळे नगर शहराला पुढचे पंधरा वर्षे चोवीस तास पाणीपुरवठा होत राहील असे ते म्हणाले.

घनकचऱ्याचा विषय नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होता, स्वछता रँकिंगमध्ये महानगर पालिका 274 नंबर होती स्पर्धेमध्ये आपण सहभागी होतो, कचरा कुंडी मुक्त शहर, घंटा गाडीद्वारे कचरा संकलन यामुळे देशात 40 नंबर वर आलो आहे, 3 स्टार मिळाल्यावर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठे योगदान होतं ,साधारण याच्यामध्ये आता घंटागाडी द्वारे प्रत्येक घरावर जाऊन आपण त्याला गोळा करतोय, कुठे कचराकुंडी मध्ये कचरा साठत नाही , छोट्या गाड्या आपण त्यासाठी घेतल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

खत निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झालेला आहे. आगामी काळामध्ये ज्यांची सत्ता आहे त्याच्या माध्यमातून ही योजना कशा पद्धतीने मार्गी लागेल यासाठी निश्‍चितपणे प्रयत्न केला जाईल असेही खासदार विखे म्हणाले. कचऱ्यातून बायोगॅस प्रकल्पाच्या माध्यमातून वीज निर्मिती करता येते का हे पाहिले जाणार आहे, असे ते म्हणाले. अमृतचे काम झालेलं नव्हतं. अडीच वर्षांमध्ये 12 किलोमीटर 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. या पाण्याच्या माध्यमातून नगर तालुक्याच्या जिरायती भागातील शेतकऱ्यांना पाणी देता येते का? यासाठी प्रयत्न करणार आहोत. पुढील सत्ताधारी यांनी लवकरच योजना पूर्ण करतील.

नगर शहराचा उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावला. महानगरपालिकेच्या माध्यमातून जमीन भूसंपादन करायचे होते. पाच महिन्याच्या कालावधीमध्ये 55 टक्के काम झाले. राज्यामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये काम होणारे ते पहिले काम असेल, असे ते म्हणाले. पुढच्या कामासाठी 17 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यासाठी आमदारांनी त्यांच्या सरकारच्या माध्यमातून जर हा निधी आणला तर उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल असे ते म्हणाले.

एक खासदार या नात्याने पक्षात नवा होतो. नगर जिल्ह्याने स्वीकारलं. आमदार माझ्या विरोधात निवडणूक लढवून देखील आम्ही एकमेकांशी चर्चा करु शकलो, नगर शहराच्या कामासाठी आमची मैत्री झाली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी एकत्र राहिले, एकत्र येवून कामे मार्गी लावली, तर नगर शहराच्या नागरिकांना कुठल्याही गोष्टीसाठी कोणाचाही दारात जावे लागणार नाही, हाच या आघाडीच्या उद्देश आहे. महाराष्ट्रामध्ये कोणाचे सरकार सरकार आहे, किती भांडत आहे, पण माझा व्यक्तिगत प्रश्न आहे ,आम्ही सांगतो की, जे काही सहकार्य आपण आम्हाला देत आला आहात, या पद्धतीचा आशीर्वाद आणि सहकार्य ठेवा.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, महानगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेवकांचा निधीतुन कामे केली जातात. गेल्या काही वर्षांमध्ये नगरच्या राजकारणामध्ये अनेक विकासकामांना खोडा घालण्याचा प्रकार सुद्धा घडलेला आहे. कुठे अतिक्रमण काढून घ्यायचे नाही, तू कुठे रस्ता सुद्धा मोकळा करून द्यायचा नाही, अशा प्रकारचा विषय सुद्धा केला गेला. विकासाच्या संदर्भात मध्ये आलेला निधी अनेक वेळेला परत गेल्याची उदाहरणे आहे. भविष्याचा विचार करता आगामी काळामध्ये नागरिकांना मुलभूत सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत. नगर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून येत्या सहा महिन्यांमध्ये अमृत योजना पूर्ण झाल्यानंतर नगर शहराला पूर्ण क्षमतेने पाणी मिळेल. भविष्यामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून आलेला निधी हा विकास कामांना योग्य पद्धतीने कशा पद्धतीने वापरला जाईल व ती कामे कशा पद्धतीने मार्गी लावली जातील, या दृष्टिकोनातून नगरसेवक व लोकप्रिय एकत्रितपणे काम करावे, असेही ते म्हणाले.

माजी आमदार शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, महापौरपदाच्या काळात वाकळे यांनी अनेक योजना राबवल्या. नगर शहराच्या विकासाचा ध्यास डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अनेक कामे केली. जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यावर त्यांनी भर दिला. केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या काही योजना होत्या त्या पूर्णत्वाला नेण्याचं काम या अडीच वर्षाच्या कार्यकाळात झालं ही एक प्रकारची अभिमानाची बाब आहे, असे ते म्हणाले. शहरातील रस्ते वीज पाणी हे प्रश्न सोडविण्यासाठी काम सुरू केले असून त्यासाठी सुद्धा वेगळ्या प्रकारचे प्रकल्प राबवले जात आहेत. त्याची कामे सुद्धा आता प्रगतिपथावर आहेत, असे ते म्हणाले. विकासकामांमध्ये राजकारण न आणता शहराचा विकास हाच ध्यास ठेवून आगामी काळामध्ये वाटचाल करावी, असे ते म्हणाले.

महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की नगर शहरामध्ये सत्तेच्या माध्यमातून आम्ही अनेक विविध कामे हाती घेतली. नगर शहरामध्ये पथदिवे, रस्ते हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून सुमारे दोनशेहून अधिक कोटी रुपयांचा निधी आणला गेला व त्यामुळे या अमृत योजना असो किंवा फेज टू असो या कामांना गती देता आली. अनेक अडथळ्यांची शर्यत पार केली. मात्र कधीही मागे वळून बघितले नाही. राजकारणापलीकडे जाऊन आम्ही नगर शहराचा विकास हेच उद्दिष्ट घेऊन आम्ही काम केले आहे. मला भाजपा व सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी साथ दिली, त्यामुळेच मी काम करू शकलो असे ते म्हणाले.

शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये भाजपा व राष्ट्रवादीची सत्ता होती ही वस्तुस्थिती आहे. मात्र फक्त राजकीय बातम्या येत होत्या. विकासकामांच्या बातम्या येत नव्हत्या. म्हणून आम्ही आता हा इतिहास मांडत आहोत. येथील आमदारांनी आम्हाला साथ दिली. नगर शहराच्या विकास कामांना साथ देतात, असेही खासदार विखे म्हणाले.