‘सुखोई-30’ वायूसेनेकडे सुपूर्द, देखभाल, दुरुस्तीनंतर अनेक उड्डाणे यशस्वी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नाशिक

नाशिकजवळील ओझर वायूसेना केंद्राने प्रथमच ‘सुखोई-30 एमकेआय’ या लढाऊ विमानाचे देखभाल व दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची अनेक उड्डाणे यशस्वी केली. शनिवारी हे विमान वायूसेनेच्या ऑपरेशनल तुकडीकडे देशसेवेसाठी सुपूर्द करण्यात आले. ओझरच्या केंद्राने हिंदुस्थानातच या अत्याधुनिक विमानाचे देखभाल व दुरुस्तीचे संपूर्ण काम यशस्वी करीत आपली कार्यकुशलता सिद्ध केली आहे.

ओझर येथील वायूसेना केंद्र हे हिंदुस्थानी वायूसेनेतील लढाऊ विमानांची देखभाल व दुरुस्तीचे काम करणारे एक प्रमुख केंद्र आहे. यापूर्वी येथे मिग-21, मिग-23, एसयू-7, मिग-29 या प्रकारच्या अनेक विमानांची देखभाल व दुरुस्ती करण्यात आली आहे. आता अत्याधुनिक सुखोई-30 एमकेआय विमानाची देशातच संपूर्ण देखभाल व दुरुस्ती करण्यात या केंद्राने यश मिळविले आहे. या कामानंतर 24 एप्रिल रोजी या विमानाचे पहिले उड्डाण यशस्वी झाले. वायूसेनेत पाठविण्यापूर्वी त्याची अनेक उड्डाणे घेण्यात आली. त्याची संपूर्ण कार्यक्षमता सिद्ध झाल्यानंतर वायूसेनेच्या ऑपरेशनल तुकडीकडे देण्याचा निर्णय झाला. ओझर केंद्रात आज हा औपचारिक सोहळा पार पडला. यावेळी अनुरक्षण कमांडचे कमांडिंग इन चीफ एअर मार्शल हेमंत शर्मा यांनी हे विमान दक्षिण-पश्चिम वायू कमांडचे कमांडिंग इन चीफ एअर मार्शल एच. एस. अरोरा यांच्याकडे सुपूर्द केले. ओझर वायूसेना केंद्राचे एअर कमांडर समीर बोराडे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक परिश्रमाचे त्यांनी कौतुक केले. हे महत्त्वपूर्ण लक्ष्य गाठण्यासाठी या केंद्राला एचएएलचे सहकार्य लाभले, त्यांचेही त्यांनी आभार मानले. यावेळी नवी दिल्ली येथील वायूसेना मुख्यालय, नागपूर अनुरक्षण कमांड, गांधीनगर येथील दक्षिण-पश्चिम वायू कमांड आणि एचएएलचे वरिष्ठ अधिकारी हजर होते.