सुमन कल्याणपूर यांना अखेरचा निरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेली सहा दशके आपल्या मृदु- मुलायम आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे रविवारी निधन झाले आणि एक सुरेल प्रवास थांबला. त्यांच्या निधनाने देशभरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर आज सांताक्रुझ येथील पवनहंस स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सच्चा सूर दिगंताच्या वाटेवर निघाला. गान तपस्विनीला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.

सोमवारी सकाळी सुमन कल्याणपूर यांचे पार्थिव त्यांच्या अंधेरी येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, गायिका वैशाली सामंत, महापौर रितु तावडे, निवेदिका मंगला खाडिलकर, मंदार आपटे आदींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर सांताक्रुझ येथील पवनहंस स्मशानभूमीत विद्युत दाहिनीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिगंताच्या वाटेवर सुरांची साथ

सुमन कल्याणपूर हा दैवी सूर दिगंताच्या वाटेवर निघाला. मात्र त्यांची सुरेल सफर पिढय़ान्पिढय़ा रसिकांच्या मनात जिवंत राहील. स्मशानभूमीत उपस्थितांनी त्यांची गाणी गाऊन त्यांना अलविदा केला. गायक सुरेश वाडकर यांनी ‘अजहु न आए बालमा’ गाण्याच्या ओळी म्हटल्या, तर आप्तेष्टांनी ‘रहे ना रहे हम’ ‘ओंकार प्रधान रुप गणेशाचे’ गाणे म्हणत सुमनताईंना अखेरचा निरोप दिला.

पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

‘गायिका सुमन कल्याणपूर जी यांच्या निधनामुळे मला अत्यंत दुःख झाले आहे. त्यांच्या सुमधुर आवाजाने आणि भावपूर्ण गायकीने आपल्या सांस्कृतिक क्षेत्राला खऱ्या अर्थाने समृद्ध केले. त्यांनी गायलेल्या गाण्यांमुळे संगीतप्रेमी आणि भारतीय चित्रपटाच्या चाहत्यांच्या मनात त्यांनी विशेष स्थान निर्माण केले अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.