
नांदेड जिल्ह्यात तापमानाचा पारा गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. वातावरणातील बदल आणि हवेतील गारवा कमी झाल्याने ही तापमानवाढ जाणवत आहे. त्यातच 1 मार्च रोजी जिल्ह्यात तापमानाची ३४ अंश सेल्सिअस इतकी नोंद करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांना या वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यात याव्या, अशी मागणी पालक, विद्यार्थी, शिक्षकांमधून होत आहे.
वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांकडून दरवर्षी मार्च महिना सुरू झाला की, शिक्षण विभाग शाळा सकाळ सत्रात भरविण्याचा निर्णय घेतात. पण यावर्षी मार्च महिना सुरू होऊन चार दिवस उलटले तसेच वाढती उन्हाची तीव्रता लक्षात घेता शाळा सकाळ सत्रात भरविण्याचा निर्णय जिल्हा परिषद शिक्षण विभागाने घेतला नाही. उन्हाचा तडाखा विचारात घेता वाढते तापमान विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोकादायक आहे,अनेक गावांत पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने मुलांना पिण्याचे पुरेसे पाणी उपलब्ध नाही. काही शाळांत पंखे नसल्याने विद्यार्थी उकाड्याने हैराण होत आहेत. पारा चाळिशीच्या जवळ गेला आहे. त्यामुळे दुपारच्या सत्रातील शाळा विद्यार्थ्यांसाठी असह्य होत आहे.
जिल्हा परिषदेच्या व इतर माध्यमिक शाळांमध्ये इतर ठिकाणाहून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी येतात. काही विद्यार्थी एक ते दोन किलोमीटर पायी किंवा सायकलवर उन्हामध्ये प्रवास करत येतात. उन्हाचा पारा वाढत असून सकाळी 9 वाजेपासून उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात होत आहे. सर्व बाबीचा विचार करून शिक्षण विभागाने शाळा तात्काळ सकाळ सत्रात भरविण्याचे आदेश काढावेत, अशी मागणी जोर धरत आहे.




























































