विराट तीन कसोटींत नाही, चिंता कशाला? सुनील गावसकरांचा टीम इंडियावर विश्वास

हिंदुस्थानचा स्टार खेळाडू व यशस्वी कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन कसोटींना मुकणार आहे. यामुळे कसोटी मालिकेवर विपरीत परिणाम होईल अशी चर्चा क्रिकेटवर्तुळात रंगू लागली आहे. मात्र हिंदुस्थानचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी विराट कोहलीच्या अनुपस्थितीत हिंदुस्थानी क्रिकेटपटू आपल्या खेळाचा स्तर आणखीन उंचावतात. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही, असे स्पष्ट मत व्यक्त करीत टीम इंडियाच्या इतर खेळाडूंवर विश्वासही दाखवला आहे.

सुनील गावसकर पुढे म्हणाले, एका बाबींवर लक्ष टाकल्यास प्रकर्षाने दिसून येईल की, विराट कोहली ज्यावेळी अनुपस्थित राहिलाय त्यावेळी हिंदुस्थानी संघ जिंकलाय. धरमशाला येथे झालेली ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी, अफगाणिस्तानविरुद्धची कसोटी, निदहास ट्रॉफी, आशियाई कप या सर्व लढती, स्पर्धांमध्ये हिंदुस्थानने बाजी मारलीय. विराट कोहली संघामध्ये नसताना हिंदुस्थानी खेळाडू त्याची उणीव भरून काढताना आणखीन चांगली कामगिरी करतात.

सध्या ऑस्ट्रेलियन दौऱयावर लक्ष
हिंदुस्थानी संघाला दोन कर्णधार असायला हवेत का, असा प्रश्न सुनील गावसकर यांना केला असता ते म्हणाले, याबाबत ऑस्ट्रेलियन दौऱयानंतर चर्चा करूया. सध्या ऑस्ट्रेलियन दौऱयावर लक्ष देऊयात. हा अत्यंत महत्त्वाचा दौरा आहे. ऑस्ट्रेलियन संघात दर्जेदार खेळाडूंचे कमबॅक झाले आहे. कोरोनाने आपल्याला खूप काही शिकवले आहे. त्यामुळे जास्त पुढचा विचार आताच करायला नको, असेही त्यांना वाटते.

रहाणे, पुजारासाठी आव्हानात्मक
सुनील गावसकर यांनी यावेळी अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांच्याबाबतही वक्तव्य केले. ते म्हणाले, हा दौरा दोघांसाठी आव्हानात्मक असेल. अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद दिल्यास त्याच्यासाठी हे हितकारक ठरते. तो परिस्थितीवर नियंत्रण मिळवतो. त्यामुळे निवड समितीनेही विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व सोपवले आहे. चेतेश्वर पुजाराच्या फलंदाजी स्ट्राईक रेटबद्दल टीका करण्यात येते. त्याने आक्रमक खेळायला हवे असेही सांगण्यात येते, पण जोपर्यंत तो धावा करतोय तोपर्यंत त्याला काहीही सांगण्याची गरज नाही. हिंदुस्थानसाठीही हे चांगले आहे, असे सुनील गावसकरांना वाटते.

आपली प्रतिक्रिया द्या