दिंडोशीतील प्रलंबित कामे पावसाळय़ापूर्वी मार्गी लावा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

 

 

दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील रखडलेल्या कामांसह पावसाळय़ात स्थानिकांची गैरसोय होऊ नये यासाठी  उद्यान, रस्ते रुंदीकरण, नालेसफाई ही कामे लवकर मार्गी लावावी, अशी मागणी शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी आज पी-उत्तर विभागातील साहाय्यक आयुक्तांकडे आढावा बैठकीवेळी केली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारीही उपस्थित होते.

दिंडोशी मतदारसंघातील विविध प्रलंबित कामांचा  आढावा घेण्यासाठी आमदार सुनील प्रभू यांनी शिवसेना पदाधिकाऱयांसमवेत पी-उत्तर महापालिका प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. रस्त्यांमधील बॉटल नेक काढून रस्ते पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले करावे, त्यामुळे मालाडमधील आप्पापाडय़ासारखी आगीची भीषण घटना घडली तर अग्निशमन दलाला तातडीने कार्यवाही करून आग आटोक्यात आणता येईल, वाहतूककोंडी फोडण्यासाठी रस्ते खड्डेमुक्ते करून समतल केले तर वाहतुकीचा वेग वाढेल, त्यासाठी रस्ते सिमेंट-काँक्रीटकरण केले जावे, पावसाळय़ापूर्वी नालेसफाई पूर्ण करावी, उद्यानांची कामे लवकरात लवकर पूर्ण करून रहिवाशांची गैरसोय टाळावी, अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी केली. बैठकीला माजी उपमहापौर सुहास वाडकर, तुळशीराम शिंदे, विधानसभा संघटक विष्णू सावंत, रीना सुर्वे, पूजा चौहान, उपविभागप्रमुख सुनील गुजर, गणपत वारिसे, साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, सहाय्यक अभियंता परिरक्षण जमादार, अमोल दलाल, इंगोले, सहाय्यक उद्यान अधीक्षक योगेंद्रसिंह कच्छावा आदी उपस्थित होते.