शिवडीतील विद्यार्थ्यांसाठी बसची तातडीने व्यवस्था करा , सुनील शिंदे यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवडीतील प्रभाग क्रमांक 206 मधील विद्यार्थ्यांना मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत जाण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडण्याची जीवघेणी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या विद्यार्थांच्या सोयीसाठी शाळेची विशेष बस सुरू करण्यात आली होती; परंतु ती ऑगस्ट महिन्यापासून बंद करण्यात आली आहे. ही बससेवा तातडीने सुरू करण्याचे आदेश द्यावेत, असा मुद्दा शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी 289 अन्वये सोमवारी विधान परिषदेत मांडला.

शिवडीतील प्रभाग क्रमांक 206 हा विभाग प्रचंड रहदारीचा असून याच ठिकाणी शिवडी-न्हावा शेवा पुलाचे काम सुरू आहे. हा विभाग मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारीत येत असल्याने या ठिकाणी सिग्नन यंत्रणादेखील कार्यान्वित नाही. या भागात भारत पेट्रोलियम तसेच अन्य पेट्रोलियम कंपन्या असल्याने मोठय़ा प्रमाणावर टॅंकरची वर्दळ सुरू असते याकडेही आमदार शिंदे यांनी या सूचनेद्वारे लक्ष वेधले.