पुन्हा नवी तारीख! शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणा संदर्भातील सुनावणी पुढे ढकलली

शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता 21 जानेवारी 2026 ला होणार आहे. न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठापुढे हे प्रकरण सुरू होते.

यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ”हे प्रकरण अत्यंत गंभीर असून तुम्ही यावर लवकरात लवकर सुनावणी घ्यायला हवी व त्यासाठी आम्हाला दोन तास लागतील असे आम्ही न्यायालयाला सांगितले. परंतू न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी 21 जानेवारीची तारिख दिलीय ती आम्हाला अजिबात अपेक्षित नव्हती”, असे ते म्हणाले.

शिवसेनेशी गद्दारी केलेल्या शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या 2022 मधील निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. मागील तीन वर्षे प्रलंबित राहिलेल्या या याचिकेवर न्यायालय अंतिम सुनावणी घेणार आहे. शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय पूर्णपणे असंवैधानिक आणि पक्षपाती आहे. तो निर्णय रद्द करण्यात यावा, अशी विनंती याचिकेतून केली आहे.

तसेच शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या निर्णयाला विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयालाही स्वतंत्र याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंतरिम अर्ज करण्यात आला आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह वापरण्यास रोखण्याची मागणी अंतरिम अर्जाद्वारे केली आहे. या सर्व याचिकांवर न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ अंतिम सुनावणी सुरू करणार होते.