बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण; खासदार नवनीत कौर यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बनावट जात प्रमाणपत्रामुळे अडचणीत सापडलेल्या अमरावतीतील अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला न्यायमूर्ती विनीत शरण आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने मंगळवारी स्थगिती दिली. तसेच सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावली.

नवनीत कौर राणा यांनी बनावट जात प्रमाणपत्र बनवून लोकसभेची निवडणूक जिंकली, असा आरोप करीत शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे याचिका दाखल केली होती. त्यावर नागपूर खंडपीठाने 9 जूनला नवनीत कौर यांचे जात प्रमाणपत्र रद्द करून त्यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. त्यामुळे खासदारकी संकटात आल्याने नवनीत कौर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या अपिलावर मंगळवारी न्यायमूर्ती विनीत शरण यांच्या खंडपीठाने सुनावणी केली आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. याप्रकरणी आता 25 जूनला सुनावणी होणार आहे.