
शेजाऱ्यासोबत झालेला वाद किंवा मारहाणीचा प्रकार घडला असला तरी आयपीएस कलम 306 अंतर्गत जीवन संपविण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा मानला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने अपीलकर्ता महिलेची निर्दोष मुक्तता केली.
दोन शेजारणींमध्ये झालेल्या भांडणात एकीने आत्महत्या केली. यानंतर दुसऱ्या महिलेला चिथावणीखोर वक्तव्याबद्दल कर्नाटक उच्च न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला गीताने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. तिच्या याचिकेवर न्या. बी. व्ही. नागरत्ना आणि के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
या वेळी खंडपीठाने निरीक्षण नोंदवले की, शेजाऱ्यांबरोबरची भांडणे दुर्दैवी आहेत; परंतु समूह म्हणून जीवन जगताना ती एक सामान्य बाब आहे. तुमच्या शेजाऱ्यावर प्रेम करा, ही आदर्श परिस्थिती असली तरी, शेजाऱ्यांसोबत भांडणे सामाजिक जीवनातील सर्वसामान्य घटना आहे. प्रश्न असा आहे की, जीवन संपविण्यास प्रवृत्त करण्याचा खटला तथ्यांवरून घडला आहे का? या प्रकरणी सादर करण्यात आलेल्या पुराव्यांमधून हा प्रकार जीवन संपविण्यासाठी प्रवृत्त करण्यात आला हे सिद्ध झालेले नाही. रागाच्या भरात उच्चारलेला शब्द कारण ठरू शकत नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.