
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
रामजन्मभूमी प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची तयारी दर्शवून सर्वोच्च न्यायालयाने आज या प्रकरणात मूळ पक्षकार असलेल्या गोपाळ सिंह विशारद यांना मोठा दिलासा दिला. तुमच्या मागणीचा आम्ही सकारात्मक विचार करू असेही यावेळी सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांनी विशारद यांना सांगितले.
रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने तीन मध्यस्थांची नेमणूक करूनही या प्रकरणात अद्याप कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने सुनावणी घ्यावी अशी विनंती करणारी याचिका या प्रकरणात मूळ पक्षकार असलेल्या गोपाळ सिंह विशारद यांनी ज्येष्ठ विधिज्ञ पी. एस. नरसिम्हा यांच्यामार्फत दाखल केली. या याचिकेची आज वरील खंडपीठासमोर सुनावणी झाली.
आणखी काही दिवस धीर धरायला काय हरकत आहे?
रामजन्मभूमीबाबत सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एफ. एम. कलिफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीने आपला अहवाल सादर करण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत वेळ मागितला आहे. या प्रकरणात नक्कीच तोडगा निघेल याबाबत मध्यस्थ कमालीचे आशावादी आहेत. असे असताना समितीला आणखी काही दिवस वाढवून देण्यास काय हरकत आहे. हा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. असे असताना आणखी काही दिवस धीर धरायला काय हरकत आहे, असा सवालही यावेळी सरन्यायाधीशांनी केला.
























































