चंद्रकांत पाटील पडले, मोदी पाहात राहिले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे अडखळून पडत असतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पाटील हे पडत असताना गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी त्यांना सावरलं आणि पुन्हा उभं केलं. हे सगळं घडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाटील यांच्याकडे नुसते पाहात उभे होते. त्यांनी नामफलकाच्या उद्घाटनासाठी हातात धरलेली दोरीही सोडली नाही असं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. राहुल गांधींवर टीका करण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांकडून केलेल्या जाणाऱ्या ट्विटला उत्तर देण्यासाठी काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाटे यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ ऑगस्ट 2022 मधला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन केलं जात असताना ही घटना घडली होती.

काँग्रेस खासदार राहुल गांधी हे सध्या भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करत आहेत. या यात्रेदरम्यान आयोजित करण्यात आलेली सभा संपवून राहुल गांधी हे मंचावर काही लोकांसोबत फोटो काढण्यासाठी उभे होते. यावेळी एका व्यक्तीने गर्दी असूनही त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांनी त्याला सेल्फी काढण्यापूर्वीही तसे करण्यापासून रोखलं होतं, मात्र तरीही या व्यक्तीने सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे राहुल गांधी यांनी संतापून त्याचा हात खाली ढकलला होता. हा व्हिडीओ ट्विट करत भाजपच्या अमित मालवीय यांनी राहुल गांधींनी चारचौघात कसे वागावे हे शिकले पाहिजे असं म्हटलं होतं. त्याला उत्तर देण्यासाठी सुप्रिया श्रीनाटे यांनी चंद्रकांत पाटील पडत असताना मोदींनी त्यांना मदत न केल्याचा व्हिडीओ शेअर करत उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.