महाराष्ट्राच्या खच्चीकरणात दिल्लीचे अदृश्य हात, खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supriya-sule

महाराष्ट्रात घर, पक्ष आणि राज्याचा अपमान व खच्चीकरण करण्यासाठी दिल्लीचा अदृश्य हात जबाबदार असल्याचा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केला. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी म्हणजेच आईसचा फंडा वापरला जात असल्याचे त्या म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांनी नागपूर दौऱ्यामध्ये नागपूरसह भंडारा आणि गोंदिया येथील कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडण्यात दिल्लीचे अदृश्य हात जबाबदार आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. दिल्लीश्वरांकडून महाराष्ट्राचे क्षणोक्षणी खच्चीकरण होत आहे, असे त्या पुढे म्हणाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हाबाबत 6 ऑक्टोबरला सुनावणी आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार हे समीकरण कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वांना माहीत आहे असे सांगतानाच, राष्ट्रवादीमध्ये कुठलीच फूट पडलेली नाही, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कुणी बोलले तर त्याला आईस केले जाते. इन्कमटॅक्स, सीबीआय आणि ईडीकडून त्याच्यावर कारवाई केली जाते आणि तो नंतर सत्ताधाऱयांबरोबर गेला की त्याचे पूर्णपणे डिफ्रॉस्ट होते, अशी मिश्कील टीकाही सुळे यांनी केली.