दिल्लीत दररोज महाराष्ट्र झुकतोय; सुप्रिया सुळे यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supriya-sule

दिल्लीत दररोज महाराष्ट्र झुकतोय, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. केंद्र सरकार महाराष्ट्रामध्ये दडपशाहीचे राजकारण करत असल्याचेही त्या म्हणाल्या. सध्या जे दिसतेय त्यावरून दोन पक्षांचे सरकार आहे का, की फक्त भाजपचे सरकार आहे, असे वाटत आहे, असे त्या म्हणाल्या. सध्या राज्याचे सर्व निर्णय दिल्लीतून होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जे आधीच्या सरकारमध्ये सत्तेत होते, ते आता स्वतःच घेतलेल्या निर्णयांना आव्हान देत आहेत. हे नवीनच होत असल्याचे दिसतेय. राज्याचे सर्व निर्णय दिल्लीतून होत आहे. याचाच अर्थ सध्या दिल्लीच महाराष्ट्र चालवत आहे, हे दिसून येत आहे. केंद्र सरकारला महाराष्ट्राच्या जनतेबाबत काय आस्था असणार, असा सवालही त्यांनी केला. केंद्राकडून राज्यांशी सूडाचे राजकारण केले जात आहे. केंद्र सरकारविरोधात जे बोलतात, त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. सध्या देशात सूडाचे राजकारण सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याच्या कोणत्याही छोट्या-मोठ्या गोष्टीच्या निर्णयासाठी मुख्यमंत्री दिल्लीला जातात. मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी वेळ मिळाली नसल्याने अनेक तास दिल्लीत ताटकळत थांबावे लागले, असे वृत्त आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे. हे राज्याचे दुर्दैव आहे. असे यापूर्वी कधीच घडलेले नाही. दोन्ही पक्ष त्यातील एक पक्ष आहे की नाही, तेच अजून स्पष्ट नाही. त्यामुळे आज सर्वच भाजप चालवत आहे. यावरून महाराष्ट्राचा स्वाभीमान कुठे गेलाय, असा प्रश्न पडतो. महाराष्ट्र कधीच दिल्लीसमोर झुकला नाही आणि झुकणार नाही, अशी आमची भावना होती. मात्र, आता महाराष्ट्र दररोज दिल्लीसमोर झुकत असल्याचे दिसत आहे. दिल्लीच सर्व निर्णय घेत असून येथील नेत्यांना निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याचे दिसत आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.