
हे राज्य, हा देश माझी आई आहे, अशी माझी भावना आहे. त्यामुळे आई जशी आपल्या मुलांची, कुटुंबाची काळजी घेते, तसंच मला त्या दिवशी सिल्व्हर ओकवर आलेल्या महिलांचे दु:ख समजवून घ्यायचे आहे.
सिल्व्हर ओकवरील हल्ला हा माझ्या आईवर झालेला हल्ला होता. माझ्या आईवर झालेला हल्ला म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रावर झालेला तो हल्ला असल्याच्या भावना राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या आहेत. संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
राज्याच्या सत्तेत महत्काचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या घरावर जे लोक चालून आले होते, ते नक्की कोण होते, त्यांना एकढे दु:ख का झाले? त्यांच्या नेमक्या वेदना काय होत्या? हे मला नक्कीच जाणून घ्यायचे आहे. पोलिसांना देखील तशी विनंती आपण केली असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आमच्या कुटुंबीयांवर बोलणं ही मोठी बातमी असते, त्यामुळं लोक बोलतात ठीक आहे. राज ठाकरे आणि त्यांच्या सभा याबाबत मला त्यात जास्त काही बोलायचं नाही. प्रत्येक संघटनेला बोलायचा हक्क आहे आणि ते बोलतात. कुणाला कुठं जायचं आहे त्यांना तिथं जाऊ दे. राजकारणातील हनुमान एन्ट्री यावर कोण कसा आणि काय बोध घेईल कळत नाही, असा टोला राज ठाकरे यांच्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी लगावला.
केंद्रीय तपास यंत्रणांकडून छापे मारण्याचा विक्रम सुरू आहे. अनिल देशमुख याच्या घरावर 103 रेड झाल्या हा विक्रम असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दंगली होऊ नये यासाठी प्रयत्न करा
दिल्ली आणि इतर ठिकाणी झालेल्या दंगलीच्या घटना या मन अस्वस्थ करणाऱया आहेत. हे कुणासाठी चांगलं नाही. यातून फक्त नुकसान आणि नुकसान होतं. अर्थव्यवस्थेला फटका बसतो. देशात दंगली होऊ नये यासाठी सगळ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करायला हवे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.





























































