बिनविरोध उमेदवार निवडीसाठी दबाव लोकशाही मूल्यांच्या विरोधात सुप्रिया सुळेंचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र

राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी नगराध्यक्षांसह सदस्यही बिनविरोध निवडून आल्याचे प्रकार घडले आहेत. यावेळी हे प्रकार जास्त प्रमाणात दिसत आहे. हे लोकशाहीच्या विरोधात आहे, असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे.

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वातावरण आहे, परंतु त्यात अत्यंत मोठय़ा प्रमाणात निवडणुका बिनविरोध होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. तसेच काही ठिकाणी दबाव टाकला जात आहे. पुठे भयाचे वातावरण निर्माण केले जात आहे, तर काही ठिकाण लोकशाहीविरोधी विविध प्रकारचे हातखंडे वापरले जात आहेत. ज्यामुळे सक्षम आणि इच्छुक उमेदवार नामांकन दाखल करण्यापासून वंचित राहत आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. हे वातावरण केवळ लोकशाही मूल्यांच्या विरोधातच नाही, तर निवडणुकांमधील निरोगी स्पर्धेलाही बाधा आणणारे आहे. जनतेसमोर पर्यायच उपलब्ध नसेल तर स्थानिक स्वराज्याची मूळ भावना दुर्बळ होईल आणि लोकशाहीचे विव्रेंद्रीकरण हे उद्दिष्टही अपयशी ठरेल. या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन आपण आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ज्या-ज्या ठिकाणी दबाव, बलप्रयोग अथवा कोणत्याही प्रकारच्या अनुचित तक्रारी प्राप्त होतील त्या ठिकाणी योग्य चौकशी करून कडक कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी पत्रात केली आहे.