
सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाच्या संदर्भात अत्यल्प मोबदल्याविषयी गेल्या आठ महिन्यांपासून सोलापूर जिह्यात बाधित शेतकऱयांचा रोष सुरू असताना संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी जमिनींचा मोबदला वाढून मिळावा, अशी मागणी केली असता गडकरींनी जिल्हाधिकाऱयांकडून प्रस्ताव आणण्यास सांगितले.
गेल्या आठ महिन्यांपासून सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाच्या अत्यल्प मोबदल्यावरून शेतकरी आणि प्रशासन यामध्ये संघर्ष चालू आहे. यासंदर्भात शेतकऱयांनी अनेक आंदोलने केली. जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले, पण त्यांनी आत्ता मिळतील तेवढे पैसे घ्या, बाकीचे नंतर देऊ, असे सांगितल्याने संघर्ष आणखीन तीक्र झाला. त्यामुळे या संघर्ष समितीने केंद्रीय मंत्री गडकरी यांना निवेदन दिले. यावेळी शिष्टमंडळाने रास्ता रोको, लाक्षणिक उपोषण, प्रस्तावित रस्त्याला कागदोपत्री नकार देत बाधित शेतकरी रोष व्यक्त करत असल्याचे मंत्री नितीन गडकरींना निदर्शनास आणून दिले.
समिती नेमली की नाही…यावर प्रश्नचिन्ह!
ग्रीनफिल्डमधील बाधित शेतकऱयांनी मागील महिन्यात अक्कलकोट तहसीलदार कार्यालयासमोर सहकुटुंब लाक्षणिक उपोषण केले होते. यानंतर ग्रीनफिल्ड महामार्गाच्या मोबदल्याविषयी समिती नेमल्याची माहिती दिली होती. परंतु, दिल्लीत पोहोचलेल्या शिष्टमंडळाला गडकरी यांनी जिल्हाधिकाऱयांना भेटण्यासाठी सांगितल्याने अभ्यासासाठी समिती नेमली नसल्याचे स्पष्ट झाले.


























































