मध्यप्रदेश व महाराष्ट्र पोलीस सीमेलगतच्या अवैध धंद्यांवर करणार सर्जीकल स्ट्राईक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजेश देशमाने । बुलढाणा

मध्यप्रदेश सीमेला लागून असलेल्या महाराष्ट्रातील बुलढाणा, जळगाव, अमरावती, अकोला या जिल्ह्यात चोरट्यामार्गाने अवैध शस्त्रे, गुटखा, दारु व गुन्हेगार ये-जा वाढली आहे. याला कायमचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश पोलीस व फॉरेस्ट संयुक्त सर्जीकल स्ट्राईक करणार असून त्याबाबत नुकतीच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यातील अधिकार्‍यांची बैठक झाल्याचे बुलढाणा जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी सांगितले.

बुलढाणा येथे आज पत्रकारांशी बोलताना जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ म्हणाले की, बुलढाणा जिल्ह्यालगत असलेल्या मध्यप्रदेश मधून आठ चोरट्या वाटांद्वारे अवैध शस्त्रे, अवैध दारु, अवैध गुटखा यासह गुन्हेगारांची ये-जा वाढली आहे. अशीच अवैध धंद्यांची वाहतूक महाराष्ट्रातील सीमेलगतच्या जळगाव, अमरावती, अकोला जिल्ह्यात देखील वाढली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्य पोलीस अधिकार्‍यांची एक बैठक झाली. त्यामध्ये मध्यप्रदेश पोलीस व महाराष्ट्र पोलीस व फॉरेस्ट यांनी संयुक्तरित्या अवैध शस्त्रास्त्र कारखाने, अवैध दारु फॅक्टरीसह गुटखा यावर सर्जीकल स्ट्राईक करुन कारवाई करण्याचे ठरले आहे. लवकरच तारीख ठरवून त्याबाबत आम्ही संयुक्त कारवाई करणार आहे. त्याचबरोबर मध्यप्रदेश मधून बुलढाणा जिल्ह्यात ज्या आठ चोरवाटा आहे त्याही सील करणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षकांनी यावेळी दिली.