आता सर्जिकल स्ट्राईकसाठी ‘स्पेशल फोर्स’

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईक व एअर स्ट्राईकची संपूर्ण जगात चर्चा झाली. या कारवाईंमुळे पाकिस्तानचे धाबे दणणाले होते. त्यामुळे आता अशा कारवायांसाठी स्पेशल फोर्स स्थापन करण्यात येणार असल्याचे समजते. या फोर्समध्ये सहभागी होण्यासाठी हिंदुस्थानच्या लष्कर, नौदल व हवाई दलातील जवानांना विशेष ट्रेनिंग दिले जाणार आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, आर्मीच्या विशेष दलातील मेजर जनरल पदावरील अधिकारी, पॅरा कमांडोज हे या स्पेशल फोर्सचे नेतृत्व करतील. या फोर्ससाठी सध्या तिन्ही सैन्य दलातील जवानांची भरती सुरू आहे. सीमा भागातील कारवाया, विशेष दहशतावाद विरोधी मिशन अशा कारवायांसाठी हे स्पेशल फोर्स काम करेल. ‘अशा कारवायासाठी जवानांना विशेष कौशल्याची गरज असते. त्यामुळे या कारवायांमध्ये यश मिळविण्यासाठी या स्पेशल फोर्समधील जवानांना विशेष ट्रेनिंग देण्यात येणार आहे. शेवटच्या क्षणी देखील या जवानांना कारवाईची माहिती दिली तरी ते कार्य पार पाडू शकतील अशा प्रकारची ही ट्रेनिंग असेल’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.