सुशांतवर विषप्रयोग झाला नाही! व्हिसेरा रिपोर्ट एम्सने सीबीआयला दिला

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी एम्सच्या विशेष पथकाने आपला अहवाल सोमवारी सीबीआयकडे सादर केला आहे. या व्हिसेरा अहवालानुसार, सुशांतवर कोणत्याही प्रकारचा विषप्रयोग करण्यात आला नव्हता. त्याच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे विषाचे अंश आढळले नाहीत. त्यामुळे सुशांतवरील विषप्रयोगाच्या दाव्याला आता पूर्णविराम मिळणार आहे.

सुशांचा मृत्यू हा आत्महत्या की हत्या, यावर गेल्या अनेक दिवसांपासून अनेक दावे- प्रतिदावे होत आहेत. त्याचा मृत्यू विषप्रयोगाने झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यादृष्टीने तपासही सुरू करण्यात आला. मात्र आता एम्सच्या डॉक्टरांच्या समितीने सीबीआयला दिलेल्या अहवालानुसार सुशांतचा मृत्यू विष दिल्यामुळे झालेला नाही, हे स्पष्ट झाले आहे.

एम्स डॉक्टरांच्या समितीचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी अहवालाबाबत माहिती दिली. एम्सच्या डॉक्टरांकडून सुशांतच्या पोस्टमार्टमच्या अहवालाचे मूल्यांकन करण्यात आले आहे. तसेच त्याच्या आतडय़ाचे परीक्षण करून ही हत्या आहे की आत्महत्या, याचा अहवाल सीबीआयला दिला गेला आहे. विषप्रयोग म्हणता येईल, असा कोणताही पुरावा त्यांना उपलब्ध झालेला नाही, असे या अहवालाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोणत्याही अंतिम निर्णयापर्यंत येण्याआधी कायदेशीर पैलूंवर लक्ष दिले पाहिजे, असे वक्तव्य डॉ. सुधीर गुप्ता यांनी काल केले. याप्रकरणात एम्स आणि सीबीआयचे एकमत झाले आहे. मात्र अद्याप आणखी विचारविनियमाची गरज आहे. काही कायदेशीर गोष्टींकडेही बघितले पाहिजे. तरच तो अंतिम निष्कर्ष असेल, असे सूचक उद्गार डॉ. गुप्ता काढले होते.

14 जून रोजी सुशांतचा मृतदेह त्याच्या फ्लॅटमध्ये सापडला होता. त्यानंतर काही दिवसांनी सुशांतच्या परिवाराकडून त्याच्यावर विषप्रयोग झाल्याचा आरोप आणि दावा करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी त्याचा मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याचे सांगितले होते. नंतर हे प्रकरण मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवण्यात आले. विषप्रयोग किंवा तत्सम घटक तपासण्यासाठी एम्सच्या फॉरेन्सिक टीमने 7 सप्टेंबर रोजी व्हिसेरा टेस्ट केली होती. त्याचा अहवाल या प्रकरणात महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

कलिना लॅबने आधीच सांगितले होते…

मुंबईतील कलिना फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने जुलै महिन्यात मुंबई पोलिसांना आपला अहवाल दिला होता. त्या अहवालात सुशांतवर विषप्रयोग झाला नसल्याचे स्पष्ट सांगण्यात आले होते. तशी शक्यताच फेटाळली होती. याबाबतची माहिती कलिना फॉरेन्सिक लॅबने एम्सचा रिपोर्ट उघड झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज दिली.

राजकीय डाव उघड

याच मुद्यावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  नाव न घेता भाजपच्या नेत्यांवर  निशाणा साधला. ज्यांनी पाच वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले. ज्यांच्या हातात मुंबई पोलीस दल होते तेच आता टीका करत आहेत. बिहारच्या निवडणुका डोळयासमोर ठेवून हे संपूर्ण प्रकरण रेटण्यात आले. बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांचा राजकीय उपयोग करण्यात आला. आता त्यांनी राजीनामा देउन जेडीयूत प्रवेश केला आहे. या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्र तसेच मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांनी केला. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी हा उदयोग केला असल्याचे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आले असल्याचेही अनिल देशमुख म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या