
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केल्याचा व्हिडीओ प्रसारित झाल्यामुळे भाजप आमदाराच्या तक्रारीनंतर शिक्षण अधिकाऱयाने एका शिक्षकाला सेवेतून निलंबित केले होते. परंतु मिमिक्री केली म्हणून शिक्षकाला सेवेतून निलंबित केले जाऊ शकत नाही, निलंबनाच्या अधिकाराचा वापर विवेकपूर्ण आणि ठोस आधारावर व्हायला हवा, असे सांगत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठाने या शिक्षकाच्या निलंबनाला स्थगिती दिली आहे. अधिकाऱयांनी राजकीय दबावाखाली कोणावरही कारवाई करू नये, असे अधिकाऱयाचे कान टोचत हे प्रकरण पुन्हा विचार करण्यासाठी संबंधित अधिकाऱयाकडे पाठवले आहे.
शिवपुरी जिह्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षक साकेत कुमार पुरोहित यांनी 13 मार्च 2026 ला फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट टाकली होती. या व्हिडीओमध्ये त्यांनी गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमतीवर टिप्पणी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या विरोधात भाजप आमदार प्रीतम लोढी यांनी संबंधित शिक्षकाविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीची तत्काळ दखल घेत शिक्षकाला निलंबित करण्यात आले. या निर्णयाविरोधात शिक्षकाने याचिका दाखल केली. यात म्हटले की, व्हिडीओत काहीही आक्षेपार्ह नव्हते. तसेच स्वतंत्र चौकशीशिवाय घाईघाईत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, असे म्हटले होते. न्यायमूर्ती आशिष श्रोती यांच्या एकल पीठाने टिप्पणी केली की, निलंबनाचा वापर विचारपूर्वक केला पाहिजे, केवळ अधिकार असणे पुरेसे नाही. तर सुनावणीदरम्यान शासनाने युक्तिवाद केला की निलंबन ही शिक्षा नसून, चौकशी निष्पक्ष ठेवण्यासाठी एक अंतरिम पाऊल आहे, असे म्हटले.
काय होते व्हिडीओत
पंतप्रधान मोदींची मिमिक्री करताना या शिक्षकाने म्हटले होते की, माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो गॅसचे दर कमी झाले का? नाही झाले…वाढले का? वाढले.
बंधू-भगिनींनो, गॅसवरची पोळी खाल्ल्याने पोटातही गॅस तयार होतो. जर पोटात गॅस तयार झाला तर तुम्ही आजारी पडाल आणि जर तुम्ही आजारी पडलात तर देशही आजारी पडेल.
त्यामुळे गॅसचे दर वाढल्याने आता सामान्य माणूसही चुलीवरची पोळी खाईल आणि श्रीमंतही… आणि श्रीमंत-गरीब यांच्यातील दरी कमी होईल, बंधू-भगिनींनो.



























































