
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडली होती. त्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश केंद्र सरकारने राष्ट्रीय चौकशी संस्थेला (एनआयए) दिले आहेत. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास मात्र राज्याचे दहशतवादविरोधी पथकच (एटीएस) करणार आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात माहिती दिली. स्कॉर्पिओमधील स्फोटके प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस व्यवस्थितरीत्या करत असतानाच केंद्र सरकारने आदेश काढून तो एनआयएकडे सोपवला. यापूर्वीही अशाच प्रकारे अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास केंद्राने सीबीआयकडे दिला होता, परंतु सात महिने उलटल्यानंतरही अद्याप काहीच निष्पन्न झालेले नाही, असे देशमुख म्हणाले.
एनआयएकडे तपास देण्यात काळंबेरं… आम्ही उघड करू – उद्धव ठाकरे
अंबानींच्या घराबाहेरील स्फोटके प्रकरणाचा तपास एनआयकडे देण्याचा केंद्राचा डाव असेल तर त्यात काहीतरी काळंबेरं आहे आणि आम्ही ते तपासातून उघड केल्याशिवाय राहणार नाही. तपास यंत्रणा या कोणा एकटय़ाची मक्तेदारी नसतात. नवीन सरकार येते तेव्हा यंत्रणा तीच असते. त्या यंत्रणेवर विश्वास आणि स्वतःवर आत्मविश्वास असावा लागतो. तो आमच्यामध्ये आहे, म्हणूनच आम्ही तो तपास एटीएसकडे दिला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
मोहन डेलकरांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱयांना शासन करू
‘सात वेळा खासदार म्हणून निवडून आलेले सिल्वासाचे मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली. त्या प्रकरणाची चौकशी राज्य सरकार अत्यंत गांभीर्याने करेल. या गंभीर विषयावर बोलण्यास विरोधी पक्षाला तोंड नाही. डेलकर यांच्याकडे सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये ज्यांचा उल्लेख आहे त्यांची चौकशी केली जाईल आणि त्या व्यक्ती कितीही मोठय़ा असल्या तरी त्यांना शासन करू.’ असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
‘सरकार येते आणि जाते पण मूळ यंत्रणा बदनाम करता कामा नये, असे अटलबिहारी वाजपेयी म्हणायचे. परंतु महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम विरोधी पक्ष करत आहे. सर्वकाही केंद्राच्याच अखत्यारित असल्याचे विरोधी पक्ष दाखवत आहे. मग इंधन दरवाढीचा मुद्दाही त्यांच्या पदरात टाका.’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.






























































