हिवाळ्यात हाता-पायांच्या बोटांना सूज येते, ‘हे’ करा घरगुती उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिवाळ्यात वातावरणातील थंडावा वाढल्यामुळे बहुतांश लोकांच्या हातापायांना सूज येते. थंडी वाढली की, शरीरातील शिरा आकुंचन पावतात. याचा परिणाम रक्ताभिसरणावर होतो. यामुळे हातापायांच्या बोटांना सूज येते, काही जणांच्या बोटांमध्ये तीव्र खाजही सुटून असह्य वेदना होतात. काही घरगुती उपायांनी ही समस्या कमी होऊ शकते. पाहूया हे घरगुती उपाय कोणते आहेत.

गरम पाण्यात मीठ घालून त्यामध्ये 10 मिनिटे पाय बुडवून ठेवा. मीठ जंतुसंसर्ग दूर करण्यास मदत करते. यामुळे हातापायाच्या बोटांना आलेली सूज कमी व्हायला मदत होते.

थंडीत हातापायांना आलेली सूज कमी करण्यासाठी कोरफड गुणकारी आहे. कोरफडीमध्ये अँण्टीबॅक्टेरियल आणि अँण्टीइफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. यामुळे सूज कमी व्हायला मदत होते.

हळद आणि मधात अँण्टीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. यामुळे सूज येण्याची समस्या कमी होते. याकरिता हळकुंड उगळून त्यामध्ये मध मिसळा आणि हातापायाच्या बोटांना लावा. यामुळे दुखणे आणि सूज कमी होऊन आराम मिळेल.

खोबरेल तेलात भिमसेनी कापराची पावडर मिसळा. हे तेल बोटांना लावल्यास सूज कमी होते. शिवाय सुजेमुळे होणारे दुखणेही कमी व्हायला मदत होते.

हातापायाच्या बोटांना येणाऱ्या सुजेपासून सुटका होण्यासाठी दररोज झोपण्यापूर्वी रोज रात्री हातापायाची बोटे शेकवावीत. त्यानंतर पायमोजे आणि हातमोजे घालून झोपावे. हा उपाय केल्याने सूज कमी व्हायला मदत होते.

कोमट मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने बोटांची सूज दूर होते. मोहरीच्या तेलाने बोटांना व्यवस्थित मसाज करावा.