
आधीच डोकं खाजवणाऱ्या अॅशेस मालिकेतील क्रिकेटने दुसऱ्या दिवशीही आपला हट्ट सोडला नाही. कधी फलंदाजांची मस्ती, कधी गोलंदाजांची फजिती, तर कधी क्षेत्ररक्षणाचा तमाशा. पण या सगळ्या गोंधळात ज्यो रूट आणि ट्रव्हिस हेड या दोघांनी एससीजीवर चौकारांची खणखणीत आतषबाजी केली आणि अॅशेसची शेवटची कसोटी थेट मॅरेथॉन मोडमध्ये नेली. मेलबर्न कसोटी अवघ्या दोन दिवसांत आटोपल्यामुळे दोन्ही संघांवर जोरदार टीका झाली होती. मात्र एससीजीवर रुटच्या शतकाने इंग्लंडला 384 धावांपर्यंत नेले, तर हेडच्या झंझावाती आणि नाबाद 91 धावांनी ऑस्ट्रेलियाला 2 बाद 166 अशी दमदार मजल मारून दिली.
पहिल्या दिवशी सिडनीच्या नेहमीच्या लहरी पावसामुळे अवघ्या 45 षटकांवर खेळ थांबला. दुसऱया दिवशी मात्र रूटने पाऊस नाही, तर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर धावांचा मुसळधार वर्षाव केला. 160 धावांची खेळी, 41वे कसोटी शतक आणि शतकांच्या यादीत थेट रिकी पाँटिंगच्या शेजारी बसण्याचा मान मिळवला. कदाचित ऑस्ट्रेलियातील अखेरचा कसोटी सामना म्हणून त्याने 242 चेंडूंची कलाकृतीच सादर केली.
रूटच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात बऱयापैकी धावसंख्या उभी केली खरी; पण शेवट असा झाला की, चहाच्या कपात संधी ओतल्यासारखे वाटले. 9 धावांत 4 विकेट आणि अखेर डाव 384 वर संपला. हॅरी ब्रुकसोबत असलेली भागी केवळ 15 धावांची भर घालू शकली. ब्रुक 84 धावांवर बाद झाला. पुढे बेन स्टोक्स एकही धाव करू शकला नाही. पुढे जॅमी स्मिथच्या (46) साथीने सहाव्या विकेटसाठी 96 आणि विल जॅक्ससोबत 52 धावांची भागी रचत इंग्लंडला 6 बाद 373 पर्यंत नेले.
ज्यो रुट खंबीरपणे दुसरी बाजू लढवत होता. इंग्लंड सहज 400 पार होण्याची चिन्हे दिसत होती. पुढे ऑस्ट्रेलियाने 80 षटकानंतर नवा चेंडू घेतला पण रुट-जॅक्स दाद देत नव्हते. नव्या चेंडूवरही ऑस्ट्रेलियाला यश मिळत नाही म्हणून स्मिथने 92 व्या षटकात नेसरच्या हाती चेंडू दिला. तेव्हा नेसरने ही जोडीच पह्डली नाही, तर सारा डावच फिरवला. आधी जॅक्सला बाद केले. धावसंख्या झाली 7 बाद 375.मग पॅमरुन ग्रीनने ब्रायडन कार्सला टिपले आणि नंतर 98 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर रुटची 160 धावांची खेळी संपवली आणि मग तिसऱया चेंडूवर जॉश टंगचा त्रिफळा उडवत इंग्लंडचा डावही संपवला. 6 बाद 375 वरून सर्व बाद 384. अवघ्या 9 धावांत 4 फलंदाज बाद झाले.
रुटचे शतक क्र. 41 रुटने आपल्या धावा आणि शतकी खेळींचे सातत्य कायम राखताना गेल्या पाच वर्षांतील 24 वे शतक साजरे केले. वर्षातील पहिल्याच डावात त्याने आपल्या कसोटी कारकीर्दीतील 41 वे शतक झळकवताना रिकी पाँटिंगच्या शतकांची बरोबरी साधली. आता सचिन तेंडुलकर (51) आणि जॅक पॅलिस (45) त्याच्या पुढे आहेत. तसेच रुटची ही 17 वी दीडशतकी खेळी आहे. सचिन 20 दीडशतकांसह अव्वल आहे. रुटने आजच्या खेळीमुळे आपली कसोटी धावसंख्या 13,937 धावांवर नेली आहे. आता तो 14 हजार धावांच्या टप्प्यापासून केवळ 63 धावा दूर आहे. कसोटीत हा टप्पा केवळ तेंडुलकरनेच (15,921) गाठला आहे.


























































