विराट सेनेचा मालिका विजयाचा निर्धार

352

‘टीम इंडिया’ने हैदराबादमधील पहिल्या टी-20 क्रिकेट सामन्यात 208 धावांचे लक्ष्यही सहज गाठल्याने वेस्ट इंडीजच्या गोटात थोडे चिंतेचे वातावरण आहे. आता रविवारी हिंदुस्थान-वेस्ट इंडीज दुसऱ्या टी-20मध्ये तिरुवअनंतपुरम्मध्ये एकमेकांना भिडणार आहेत. विराट कोहलीची सेना सलग दुसऱ्या विजयासह तीन सामन्यांची मालिका आधीच खिशात घालण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरेल, तर विंडीजला स्पर्धेतील आव्हान राखण्यासाठी जिंकावेच लागणार आहे. टी-20 क्रिकेटमध्ये विंडीज हा सर्वात धोकादायक संघ असल्याने उद्याच्या लढतीकडे तमाम क्रिकेटशौकिनांच्या नजरा असतील.

विंडीजकडे एकास एक चढ टी-20 फेम फलंदाज आहेत. सलामीच्या लढतीत 207 धावा ठोकून त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली. मात्र, फलंदाजासाठी अनुकूल असलेल्या हैदराबादच्या खेळपट्टीवर त्यांच्या गोलंदाजीचा बलाढय़ ‘टीम इंडिया’च्या फलंदाजीपुढे निभाव लागला नाही. लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी जबरदस्त फलंदाजी करीत विंडीजच्या 207 धावा अगदीच तोकडय़ा ठरविल्या. त्यातच विंडीजच्या गोलंदाजांनी 14 वाइड आणि तीन नो बॉल टाकले. त्याचाही त्यांना फटका बसला. त्यामुळे या गोलंदाजीतील चुका सुधारून विंडीजला दुसऱ्या लढतीत उतरावे लागणार आहे.

आता जबाबदारी गोलंदाजांवर

‘टीम इंडिया’ने फलंदाजीच्या जोरावर विजयी सलामी दिली असली, तरी गचाळ क्षेत्ररक्षणाकडे काणाडोळा करणे हिंदुस्थानला महागात पडू शकते. वॉशिंग्टन सुंदर व रोहित शर्मा यांनी झेल सोडले. कर्णधार विराट कोहलीने एक झेल सोडला. विजय मिळाला म्हणून ठीक आहे, अन्यथा पराभवाचे खापर या गचाळ क्षेत्ररक्षणावरही फुटले असते. वॉशिंग्टन सुंदर व दीपक चहर ही वेगवान जोडगोळी महागडी ठरली. रवींद्र जाडेजाने टिच्चून मारा केला, तर भुवनेश्वर कुमार व युझवेंद्र चहल यांनीही बऱ्यापैकी गोलंदाजी केली. मात्र, उद्या विंडीजला 180च्या आसपास रोखल्यास फलंदाजांवरील दडपण थोडे कमी होईल. पहिला सामना फलंदाजांनी जिंकून दिला, आता गोलंदाजांनी विजयाची जबाबदारी उचलायला हवी.

उभय संघ

हिंदुस्थान – रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर.

वेस्ट इंडीज – एविन लुईस, लेण्डल सिमन्स, ब्रॅण्डन किंग, शिमरोन हेथमायर, कायरॉन पोलार्ड, दिनेश रामदीन, जेसन होल्डर, खॅरी पिअर/किमो पॉल, फॅबियन ऍलेन, हेडन वॉल्श ज्युनियर, शेल्डॉन कॉटरेल.

आपली प्रतिक्रिया द्या