
ताडदेव येथील अग्रवाल वृद्ध दांपत्याला टार्गेट करत त्यांच्या घरात चोरी करून आरोपींनी वृद्धेची हत्या केली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. ज्येष्ठ नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे आरोपींना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी कसोशीने प्रयत्न सुरू केले. अखेर या गुह्यातल्या मुख्य आरोपींना मालकाबाबतची आवश्यक माहिती पुरविणारा ‘टिपर’ पोलिसांच्या हाती लागला.
सुमित टटवाल (37) असे ताडदेव पोलिसांनी आज अटक केलेल्या आरोपी ‘टिपर’चे नाव आहे. मूळचा राजस्थानचा असलेला सुमित मालाड येथे राहत होता. तर मदन अग्रवाल यांच्या काळबादेवी येथील दुकानात तो गेल्या काही महिन्यांपासून कामाला होता.
‘टिपर’च्या बँक खात्यात पैसे जमा
सुमित हा मदन यांच्या दुकानात कामाला होता. त्यामुळे मदन यांच्याबाबतची इत्थंभूत माहिती सुमीतने आरोपींना दिली होती. त्या माहितीच्या आधारे आरोपींना रविवारी सकाळी मदन यांच्या घरात घुसून मोठा हात मारता आला होता. लाखोंचा ऐवज चोरून सटकल्यानंतर आरोपींनी सुमितच्या बँक खात्यावर काही रक्कम ट्रान्सफर केली होती. या गुह्याचा तांत्रिक तपास करीत असताना पैसे ट्रान्सफरची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यामुळे सुमितला चौकशीला बोलावल्यानंतर आरोपींना चोरी करण्यासाठी आवश्यक माहिती पुरविल्याची कबुली त्याने दिली.
मुख्य आरोपीदेखील टप्प्यात
या गुह्याचा ‘टिपर’ सुमित हाती लागला असून मुख्य आरोपीदेखील पोलिसांच्या हाती लागले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. गुन्हा केल्यानंतर पोलिसांना चकवा देत आरोपींनी परराज्यात पळ काढला होता. मात्र ताडदेव पोलिसांनी शिताफीने तपास करीत मुख्य आरोपींनादेखील ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते. आतापर्यंत चार आरोपी या गुह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले असून आरोपींचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते.






























































