माहुल पंपिंग स्टेशन उभारणीत केंद्राचा खोडा, किंग्ज सर्कल, शीवमध्ये पाणी तुंबण्याची समस्या कायम राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

किंग्ज सर्कल, शीव, गांधी मार्केट, नेहरूनगर, माटुंगा, सिंधी सोसायटी, चेंबूर, कुर्ला आणि रेल्वे मार्ग पूरमुक्त करण्यासाठी पालिकेने प्रस्तावित केलेले ‘माहुल पंंिपग’ स्टेशन केंद्राच्या खोडय़ामुळे आणखी लटकणार आहे. पंपिंग स्टेशन जागेच्या बदल्यात विकासकाला दिलेल्या जागेचा समावेश केंद्राने ‘सीआरझेड’मध्ये केल्याने आता विकासकाला नवीन जागा देण्यासाठी पुन्हा संपूर्ण प्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे माहुल पंपिंग स्टेशन उभारण्यासाठी आणखी कालावधी लागणार आहे.

मुंबईत अतिवृष्टी होण्याचे प्रकार वाढल्याने सखल भागांत पाणी भरते. त्यामुळे पालिकेने ब्रिमस्ट्रोवॅड उपक्रमांतर्गत आतापर्यंत हाजी अली, रे रोड, वरळी लव्हग्रो, क्लिव्हलँड, जुहू इर्ला आणि खार येथील गझदरबंद या ठिकाणी सहा पंपिंग स्टेशन उभारली आहेत. यामध्ये सेकंदाला हजारो लिटर पाणी समुद्रात फेकणे शक्य होत आहे. पार्श्वभूमीवर प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) खाते मागील अनेक वर्षांपासून माहुल पंपिंग स्टेशन बांधण्याकरिता केंद्र सरकारच्या सॉल्ट कमिशनर खात्याकडे जागा मिळवण्याकरिता पाठपुरावा करीत होते. मात्र याला यश आले नाही. मात्र माहुल पंपिंग स्टेशन उभारणे ही तातडीची गरज असल्यामुळे पालिकेने आता जागेच्या बदल्यात जागा मिळवून प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेतला. या पंपिंग स्टेशनसाठी पालिकेला आपली जागा देऊन प्रकल्पासाठी आवश्यक असणारी 15500 चौरस मीटर जागा विकासकाकडून मिळाली आहे. मात्र आता सदर जागेचा समावेश केंद्राने ‘सीआरझेड’मध्ये केल्याने पंपिंग स्टेशन रखडणार आहे.

असा झाला होता करार

माहुल पंपिंग स्टेशनची निकड लक्षात घेता, प्रमुख अभियंता (पर्जन्य जल वाहिन्या) यांनी मौजे आणिक न.भू.क्र. 1अ/11, 1अ/12 या दोन भूखंडांमधील 15500 चौरस मीटर जागा पालिकेच्या ताब्यात घेऊन पालिकेच्या भूखंड न.भू.क्र. 1अ/14 मधील 15500 जागा मे. अजमेरा रिऍलिटी ऍण्ड इफ्रस्ट्रक्चर इंडिया यांना प्रदान करण्याचे प्रस्तावित होते.

असे आहे प्रकरण

माहुल येथे पंपिंग स्टेशन उभारण्यासाठी अजमेरा बिल्डर व पालिका प्रशासनात जागा अदलाबदलीचा निर्णय झाला. परंतु पालिकेने बिल्डरला दिलेली जागा केंद्राने सीआरझेडमध्ये टाकली आहे. त्यामुळे तेथे विकास करणे बिल्डरला शक्य नाही. माहुल पंपिंग स्टेशन उभारण्यासाठी तब्बल 410 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र आता जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी माहुल पंपिंग स्टेशनसाठी पालिकेच्या विकास नियोजन विभागाला पर्यायी जागेबाबत कार्यवाही सुरू आहे. डीपी डिपार्टमेंटने जागा सुचवल्यावर तातडीने पंपिंग स्टेशनचे काम सुरू होईल, असे प्रशासनाने सांगितले.