तालिबानची अमेरिकेला धमकी; मान्यता दिली नाही तर किंमत चुकवावी लागेल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला असला तरी त्यांच्यासमोर अनेक अडचणी आहेत. तालिबान्यांना निधीची चणचण जाणवत असून आता त्यांनी अमेरिका आणि इतर देशांना इशारे आणि धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. तालिबानी सरकारला अमेरिका आणि इतर देशांनी मान्यता द्यावी, असे आवाहन तालिबान्यांनी केले आहे. तसेच मान्यता दिली नाही तर त्याची किंमत चुकवावी लागले, अशी पोकळ धमकीही दिली आहे.

अमेरिका आणि इतर देशांनी अफगाणिस्तानचा निधी गोठवला आहे. तालिबानी सरकारला मान्यता देत हा मिधी मिळाला नाही तर फक्त अफगाणिस्तानच नाही तर जगभरात समस्या निर्माण होतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तालिबान सरकारला मान्यता दिली नाही तर आज अफगाणिस्तानात असलेले संकट जगभरात दिसेल, असा इशारा तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी अमेरिकेला दिला आहे. अमेरिका आणि तालिबानमध्ये याआधी युद्ध झाले कारण त्यावेळी दोघांमध्ये रजनेतिक संबंध नव्हते. आता राजनेतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी तालिबानला मान्यता द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

आतापर्यत कोणत्याही देशाने तालिबानला अधिकृत मान्यता दिलेली नाही. मात्र, पाकिस्तान, चीन, रशियासह काही देश तालिबानला मदत करत आहेत. देशातील गरीबीची मोठी समस्या असून तालिबानला आता निधीची चणचण भासत आहे. देशात अनेकजण कामाच्या बदल्यात पैसे घेण्याऐवजी अन्नधान्य घेत उदरनिर्वाह चालवत आहेत. त्यातच अफगणिस्तानचा निधी अनेक देशात गोठवण्यात आल्याने सरकार चालवणे तालिबानला कठीण झाले आहे. या हतबलतेमुळे ते आता धमक्या आणि इशारे दत आहेत.