
सामना प्रतिनिधी, वासिंद
मध्य रेल्वेच्या मार्गावर असलेल्या उंबरमाळी आणि तानशेत या केवळ कागदपत्रांवर असलेल्या बिनफलाटांच्या रेल्वे स्थानकांचा वनवास अखेर 40 वर्षांनंतर आज संपला. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रेल्वे स्थानकाचे आणि प्लॅटफॉर्म बांधणीचे ऑनलाइन पद्धतीने भूमिपूजन झाले.
1970 पासून मध्य रेल्वेच्या कसारा रेल्वे स्थानकाजवळ उंबरमाळी येथे रेल्वेचे सबस्टेशन होते. तेथील कर्मचाऱ्यांकरिता लोकलला थांबा देण्यास सुरुवात झाली. तसेच उंबरमाळी व खर्डी या दोन स्थानकांमध्ये बरेच अंतर असल्याने लाहेजवळ तानशेत येथे लोकलला थांबा देण्यास सुरुवात झाली. हळूहळू परिसरातील शेकडो नागरिक उंबरमाळी व तानशेत येथील बिनाफलाटाच्या लोकलचा वापर करण्यास सुरुवात केली. जिवावर उदार होऊन प्रवासी लोकलच्या शिडीकरून लोकलमध्ये चढ-उतार करीत असत. लोकल अचानक चालू झाल्याने अनेक जण जखमी झाले.
लवकरच काम पूर्ण करणार
आज या स्थानकांचे भूमिपूजन पार पडले. यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी लककरच उंबरमाळी व तानशेत स्थानकांचे काम सुरू करून फलाट, पादचारी पूल, शेडचे काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली. यावेळी खासदार कपिल पाटील, आमदार पांडुरंग बरोरा, शिवसेनेच्या ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा जाधव, रेल्वे सीनिअर डीसीएम के.जयशंकर, सीनिअर डीईएन डी. डी. लोळगे, कल्याण – कसारा – कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव उपस्थित होते.
summary- tanshet and umbarmali stations will get platforms

























































