
>> श्रीरंग खरे
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱया लाटेचे संकट कायम आहे. पावसाळ्यात साथीचे आजार पसरल्यास कोरोनाचा आजार कोणता आणि साथीचा आजार कोणता हे ओळखणे अवघड जाणार आहे. यासाठी नेमके काय केले पाहिजे याचे उत्तर मिळवण्यासाठी कोविड-19 टास्क फोर्सचे सदस्य असलेल्या डॉ. राहुल पंडीत यांच्याशी बातचीत केली. यावेळी त्यांनी दिवसाला 10-12 लाख लोकांना लस दिल्यास पाच महिन्यांत महाराष्ट्र लसवंत होईल, असे स्पष्ट केले.
तिसऱया लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य किती सक्षम आहे?
– तिसरी लाट येणार हे निश्चित आहे. ती किती तीव्र असेल, केव्हा येणार हे आपल्या हातात आहे. यासाठी तयारी 2 फ्रंटवर करायची आहे. पहिली, म्हणजे लाटेचा मुकाबला करणे आणि दुसरी, म्हणजे म्हणजे लाट किती पुढे ढकलता येईल त्यासाठी प्रयत्न करणे. या दोन्ही गोष्टींसाठीची तयारी महाराष्ट्र गेले 2-4 आठवडे करत आहे. 4 आठवडय़ापूर्वी वाटले होते की लहान मुले यात बाधित होतील, यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी लहान मुलांसाठीच्या टास्क फोर्सची स्थापना केली. या टास्क फोर्सने एक- दीड आठवडय़ात प्रोटोकॉल तयार केले आहेत.
महाराष्ट्रातील सगळ्या लोकांना लस देण्याचे काम केव्हापर्यंत पूर्ण होऊ शकेल?
– जर आपल्याला लसींच्या योग्य प्रमाणात मात्रा मिळाल्या तर आपण दिवसाला 10-12 लाख लोकांना लस देऊ शकतो. लहान मुलांना अजूनपर्यंत लस देण्यात येत नाहीये. त्यांची संख्या वगळल्यास साधारणपणे 10 कोटी नागरिकांना 20 कोटी डोस देणे गरजेचे आहे. यासाठी 4-5 महिने लागतील. दिवसाला 10-15 लाख लोकांना लस दिल्यास सगळ्यांना दोन डोस मिळायला 4-5 महिने लागतील. आतापर्यंत जवळपास 1 कोटी नागरिकांना दोन्ही डोस मिळालेले आहेत.
पावसाळ्यात साथीचे आजार पसरतात अशा वेळी ताप असल्यास काय करायला हवे?
– हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गेल्या वर्षी साथीच्या आजारांचा फार त्रास झाला नाही कारण गेल्यावर्षी याच काळात कडक लॉकडाऊन होता. त्यावेळी बांधकामेही थांबलेली होती, ज्यामुळे डासांचा प्रादुर्भाव फार नव्हता. यावर्षी बऱयापैकी सगळ्या गोष्टी चालू असून अपेक्षित आहे की साथीचे आजार येतील. अशा परिस्थितीत ताप आला तर तो कोविडचा ताप आहे की साथीचा याचा विचार न करता थेट डॉक्टरांकडे जाऊन आवश्यक तपासण्या करून घेणे गरजेचे आहे.
मोनोक्लोनल अँटीबॉडीज कॉकटेल आपल्या राज्यात वापरले जाते का?
– हा पर्याय राज्यात उपलब्ध आहे, मुंबईतही बऱयाच रुग्णांमध्ये ते वापरले गेले असून मी देखील 2-3 रुग्णांवर त्याचा वापर केला आहे. हा उपाय मोठा खर्चिक असून त्याचा एक डोस 50-60 हजाराच्या घरात आहे. या पर्यायाच्या तातडीच्या वापरासाठी काही निकष ठरवून देण्यात आलेले आहेत. सहव्याधी असलेल्या रुग्णांना अत्यवस्थ होण्यापासून रोखण्यासाठी मोनोक्लोनल अँटीबॉडीज कॉकटेलचा वापर केला जातो.
दोन वेगवेगळ्या लसी घेतल्या तर काय होईल?
– दोन वेगवेगळ्या लसींचे डोस घेण्यामागचा हेतू हा आहे की प्रतिपिंडे प्रतिक्रिया (अँटीबॉडीज रिस्पॉन्स) चांगली असेल का? हे पाहणे. लसींच्या चाचण्या झाल्या तेव्हा दोन्ही मात्रा या एकाच लसीच्या देण्यात आल्या होत्या. तेव्हा दोन वेगवेगळ्या लसी देण्यात आल्या नव्हत्या. यामुळे या प्रश्नाचं उत्तर वैज्ञानिकदृष्टय़ा शोधणे गरजेचे आहे.


























































