
मध्य रेल्वेच्या राजधानी एक्प्रेसमध्ये एका प्रवाशाचा त्याचा महागडा आयफोन अचानक गायब झाला असल्याचे समजताच टीसीने तत्परतेने संपूर्ण ट्रेन तपासून काढत या आयफोन चोराला मोठय़ा शिताफीने पकडून आरपीएफच्या ताब्यात दिले. आग्रा येथे उतरणाऱया या प्रवाशाच्या चेहऱयावर हसू फुलले.
ट्रेन क्र. 22221 सीएसएमटी-निजामुद्दीन राजधानी एक्प्रेसमधील बी-10 च्या 49 नंबरच्या बर्थवरून शनिवारी प्रवास करणाऱया प्रवासी दीपक यादव यांचा आयफोन झाँसी स्थानक येण्यापूर्वीच गायब झाला. वेंडरने ही बातमी टीसी मनोज सिन्हा यांना सांगितली. त्यांनी लागलीच आपल्या सहकाऱयांच्या मदतीने संपूर्ण ट्रेनची तपासणी करायला सुरुवात केली. तेवढय़ात लोको पायलटजवळच्या पॉवरकारजवळील ऑन डय़ुटी मेकॅनिकने त्याला पॉवरकारच्या मध्ये कोणीतरी बाहेरून बंद केले असल्याचे सिन्हा यांना सांगितले.
सिन्हा लागलीच पॉवरकारजवळ तातडीने पोहोचले. तेथे एक तरुण सापडला. तोपर्यंत पॉवरकारचे कर्मचारी कसेतरी बाहेर पडले होते. मनोज सिन्हा यांनी त्या तरुणाला पकडून त्याच्याकडून रेल्वे कर्मचाऱयांचे पर्स आणि मोबाईल हस्तगत करण्यात आले. या तरुणाला झाँसी आरपीएफचे सहाय्यक निरीक्षक गौतम यांच्या ताब्यात देण्यात आले. याच तरुणाकडून आरपीएफने प्रवासी दीपक यादव यांचा मोबाईल हस्तगत करण्यात यश आले. प्रवासी आग्रा येथे उतरले होते, त्यांना फोन करून त्यांचा आयफोन सापडला असल्याचे कळविण्यात आले. टीसी मनोज सिन्हा यांचे सहकारी पी. आर. मीना, अरुण राय, संजीव कुमार दुबे यांनी अशा प्रकारे राजधानी एक्प्रेसमधील मोबाईल फोन चोराला पकडून पोलिसांच्या हवाली केले.
























































