पाकिस्तानच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ व्हॉट्सऍप स्टेटस ठेवणाऱ्या शिक्षकावर हातकणंगले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना एका शिक्षकाने केलेल्या देशद्रोही कृतीने सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे.

जावेद अहमद (मूळ रा. जम्मू, सध्या रा. अतिग्रे, ता. हातकणंगले) असे ताब्यात घेतलेल्या शिक्षकाचे नाव आहे. तो कोल्हापूर- सांगली मार्गावरील अतिग्रे येथील एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक होता. दरम्यान, घटनेनंतर तत्काळ स्कूल प्रशासनाने त्याची हकालपट्टी केली आहे.

जावेद अहमद हा शिक्षक असून, तो अतिग्रे येथील एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये इंग्रजी विषय शिकवत होता. तो अतिग्रे येथेच भाडेतत्त्वावर राहत होता. 14 ऑगस्टला रात्री त्याने पाकिस्तान समर्थनाचे स्टेटस त्याच्या मोबाईलवर लावले. काही विद्यार्थ्यांनी हे स्टेटस पाहिल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. हे स्टेटस व्हायरल झाल्यानंतर जिल्हा पोलीसप्रमुख व स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाच्या पोलिसांनी तत्काळ हालचाली करत अहमद याला ताब्यात घेतले. याचवेळी स्थानिक पोलीस मात्र याबाबत अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. ‘त्या’ शिक्षकावर हातकणंगले पोलिसांत गुन्हा दाखल झाला असतानाही पोलीस मात्र माहिती देण्यास टाळाटाळ करत होते.