शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षाचा अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

218
girl-rape

सामना प्रतिनिधी, न्हावाशेवा

उरण तालुक्यात माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. शाळेच्या अध्यक्षानेच पहिली-दुसरीत शिकणाऱ्या मुलींचे लैंगिक शोषण केले असल्याबाबतची तक्रार एका 7 वर्षांच्या मुलीच्या आईने केली आहे. या प्रकरणी नारायण पाटील (40) याला पोलिसांनी अटक केली आहे. आणखी 8 ते 9 मुलींचा लैंगिक छळ या आरोपींने केला असल्याची शक्यता शाळेच्या मुख्याध्यापिकांनी बोलून दाखवली.

12 एप्रिलला हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका मुलीने या बाबत शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलेला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर याबाबतची कल्पना तिने तिच्या आईला दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आणखी मुलींसोबत या नराधमाने अश्लील चाळे केले असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिकांनी सांगितले. शाळेचे काम करण्याच्या निमित्ताने नारायण पाटील या शाळेतील मुलींना एका बंद शाळेच्या इमारतीत घेवून जायचा आणि तिथे त्यांच्यासोबत अश्लील चाळे करायचा. 12 एप्रिलला देखील खड्डे खोदण्याच्या निमित्ताने या मुलींना बाहेर घेऊन गेला आणि त्यांच्याशी अश्लील चाळे केले. हा प्रकार शाळेत खाऊ शिजविणाऱ्या महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने याची माहिती मुख्याध्यापिका आणि काही पालकांना दिली.

त्यानंतर 15 एप्रिल रोजी याबाबत उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या आरोपी विरोधात भा.द.वि. कलम 354, 506 आणि पोक्सो कलम 8 आणि 12 नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या बाबत उरण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल अहेर हे अधिक तपास करत आहेत. आरोपी हा एका बड्या राजकीय पक्षाचा गाव अध्यक्ष आहे. या प्रकरणी राजकीय दबाव येऊ लागल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी उरण पोलिस ठाण्यावर धडक दिली आणि आरोपीला कोणतेही राजकीय अभय देऊ नये अशी मागणी केली. दरम्यान मंगळवारी हा प्रकार संपूर्ण तालुक्यात समजल्यानंतर या बाबत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून अनेक महिला मंडळ, संघटनानी या निंदनीय प्रकाराविरोधात सह्यांची मोहीम हाती घेतली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या