शिक्षक भरतीच्या कामांना ब्रेक, शिक्षण विभाग निवडणूक कामांमध्ये अडकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी, मुंबई

‘पवित्र’ पोर्टलवरून सुरू असलेल्या शिक्षक भरतीच्या कामांना ब्रेक लागला आहे. शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामांमध्ये अडकले असल्याने शिक्षक भरतीची प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी शिक्षक भरतीची तयारी करण्यात आली. मार्च महिन्यात शिक्षक भरतीची जाहिरातही प्रसिद्ध झाली. मात्र आचारसंहिता सुरू झाल्यानंतर भरती प्रक्रियेवर परिणाम झाला असून बीएड, डीएड धारक उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केल्यानंतरची प्रक्रिया कासवगतीने सुरू आहे. शिक्षक पदावर काम करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ‘पवित्र’ पोर्टलवर अर्ज केले आहेत. जे उमेदवार पात्र आहेत अशा उमेदवारांची नोंदणीही या पोर्टलवर झाली आहे. हे उमेदवार पात्र ठरल्यानंतर त्यांना पसंतीक्रम देण्यात येतो, मात्र अद्याप पात्र उमेदवारांना पसंतीक्रमच दिलेला नाही.

अर्ज करण्याची मुदत संपली
शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत संपली आहे. संस्थाचालकांनी शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदांचा तपशीलही जाहीर केला असून संस्थाचालकांना ते घेणार असलेल्या उमेदवाराची मुलाखत घ्यायची की नाही हा पर्याय स्वीकारण्याची मुदतही संपुष्टात आली आहे. मात्र अद्याप उमेदवारांना पसंतीक्रमच दिला नसल्याने मुलाखतीची पुढील प्रक्रियाही खोळंबली आहे.

जाहिरात कधी?
‘पवित्र’ संगणक प्रणालीवर शाळा व्यवस्थापकांनी रिक्त जागांचा तपशील सादर केल्यानंतर पालिका शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण उपसंचालक कार्यालयाद्वारे पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. ही जाहिरात पाहून आलेल्या उमेदवारांची गुणवत्ता तपासून मुलाखतीद्वारेच शिक्षक पदावर नियुक्ती केली जाणार आहे. पण ही जाहिरात कधी प्रसिद्ध होणार, हे अद्याप ठरलेले नाही.

‘पवित्र’ संगणक प्रणालीवर नोंद असलेल्या उमेदवाराचीच मेरिटनुसार शिक्षक भरतीसाठी वर्णी लागणार आहे.
शाळांनाही आपल्याकडील शिक्षकांच्या रिक्त जागांचा तपशील ‘पवित्र’वर जाहीर करायचा असून मुलाखत घेऊनच उमेदवारांची शिक्षक पदी नेमणूक करायची आहे.