शिक्षक भरतीच्या नवनव्या तारखांना भावी शिक्षक वैतागले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

गेल्या सहा वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली राज्यातील शिक्षक भरती यंदा पूर्ण होईल असे वाटत असतानाच मागील नऊ महिन्यांपासून शिक्षक भरतीची प्रक्रिया रेंगाळली आहे. एकीकडे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे शिक्षक भरतीच्या नवनव्या तारखा देत असताना दुसरीकडे मात्र एका पदावरही नवीन भरती न झाल्यामुळे लाखो उमेदवारांमधून शालेय शिक्षण विभाग व राज्य सरकारच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे.

शिक्षणमंत्र्यांच्या धमकीचा निषेध

‘गेल्या सहा वर्षांपासून राज्यातील लाखो भावी शिक्षक शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत. याबाबत शिक्षणमंत्र्यांना प्रश्न विचारला असता त्यांच्याकडून अपात्र करण्याची धमकी दिली जाते. मात्र याच शिक्षणमंत्र्यांना प्राधान्यक्रम आणि निवड प्रक्रिया यामधला फरक कळत नसेल तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे लागेल, अशी टीका डीटीएडबीएड स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर यांनी केली. महिला शिक्षक उमेदवाराने भरतीबाबत प्रश्न विचारला असता त्यांना अपात्र करण्याची धमकी शिक्षणमंत्र्यांनी देणे ही लज्जास्पद बाब आहे व ही बाब महाराष्ट्राला शोभणारी नाही, असेही मगर म्हणाले.

शिक्षक भरतीसाठी पुण्यात अन्नत्याग आंदोलन

एकाच टप्प्यात 80 टक्के शिक्षक पदभरतीची जाहिरात काढून तत्काळ पदभरती करावी यासाठी पुण्यात डीटीएडबीएड स्टुडंट असोसिएशनच्या वतीने बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत पदभरतीची जाहिरात येणार नाही तोपर्यंत उठणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्या उमेदवारांनी घेतली आहे.

 गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राज्यात 65 हजार शिक्षकांची पदे भरली जातील, अशी घोषणा केली होती. यासोबतच फेब्रुवारी 2023 मध्ये शिक्षकांच्या पात्रतेसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षाही घेण्यात आली होती, मात्र त्यानंतर शिक्षक भरतीची ही प्रक्रिया अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल मार्च 2023 मध्ये जाहीर झाला. मात्र त्यानंतर तब्बल नऊ महिने उलटले तरी शिक्षक पदभरती शासन दरबारी अडकून पडली आहे. शिक्षणमंत्री केसरकर यांनी उच्च न्यायालयात तसेच विधिमंडळामध्ये शिक्षक भरतीसंदर्भात दोन वेळा कालबद्ध कार्यक्रम सादर केला आहे, मात्र या दोन्ही तारखा उलटून गेल्या तरी शिक्षक भरती झालेली नाही.