हिंदुस्थानचा ‘विराट’ विजय; वेस्ट इंडिजला 6 गडी राखून नमवले

1118

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुल यांच्या अर्धशतकी खेळीमुळे हिंदुस्थानने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने 6 गडी राखून विजय मिळवला आहे. टी -20 तील पहिला सामना जिंकत टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजच्या 208 धावांचा पाठलाग करताना कर्णधार विराट कोहलीने नाबाद 94 तर लोकेश राहुलने 62 धावांची तडाखेबंद खेळी केली. याआधी 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाने 207 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. आजच्या या सामन्याने हा विक्रम मोडला.

वेस्ट इंडिजच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाने सावध सुरुवात केली. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या 8 धावा काढून माघारी परतला. यानंतर लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहलीने विजयी भागीदारी रचली. दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी 100 धावा केल्या. लोकेश राहुलने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना झोडपत अर्धशतक पूर्ण केले. तो 62 धावांवर बाद झाला. यानंतर विराटने ऋषभ पंतच्या मदतीने पुन्हा मोठी भागीदारी रचत हिंदुस्थानचे सामन्यातील आव्हान कायम ठेवले. ऋषभ पंतने 18 धावा केल्या. पंत माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यरही ठराविक अंतराने माघारी परतला. यानंतर विराटने शिवम दुबेच्या साथीने टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 8 चेंडू शिल्लक असताना हिंदुस्थानी संघाने बाजी मारली.

शेमरॉन हेटमायरचे अर्धशतक आणि एविन लुईस आणि कायरन पोलार्डच्या साथीने वेस्ट इंडिजने 207 धावांपर्यंत मजल मारली. लेंडल सिमन्सला माघारी धाडत टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती. मात्र, लुईस-हेटमायर आणि पोलार्ड या त्रिकुटाने हैदराबादच्या मैदानात चौफेर फटकेबाजी केली. पाचव्या षटकात वेस्ट इंडिजने 50 धावसंख्येचा टप्पा ओलांडला. 40 धावांवर एविन लुईस वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर ब्रँडन किंग आणि हेटमायर यांनी मोठी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. टीम इंडियाच्या युजवेंद्र चहलने 2 तर वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी 1 बळी घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या