मला बॉलिंग दे… मला बॉलिंग दे! गोलंदाजांच्या आग्रहामुळे रोहित शर्माची होते गोची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाला अडीच दिवसांत लोळविल्यानंतर ‘टीम इंडिया’चा कर्णधार रोहित शर्माने इरफान पठाणशी बातचित करताना एक गमतीदार खुलासा केला. विकेट घेण्यासाठी प्रत्येक गोलंदाज काहीतरी कारण सांगून मला नुसती बॉलिंग देण्याची मागणी करत होते. त्यांच्या या आग्रहामुळे माझी पण गोची होऊन जायची, असा खुलासा रोहितने केला.

रोहित शर्मा म्हणाला, प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास कोणाचेच विक्रम फारसे माझ्या लक्षात राहत नाही. त्यामुळे गोलंदाज माझ्याकडे येतात आणि काहीतरी कारण सांगून गोलंदाजी मागतात. कोणी म्हणतं मी 250 विकेटच्या जवळ आहे, कोणी म्हणतं आज माझ्या 450 विकेट पूर्ण करायच्या, तर कोणी म्हणतं मला 4 विकेट मिळाल्या आता पाचवी विकेट तरी मिळू दे ना. त्यामुळे संघातील सर्व गोलंदाजांची मागणी पूर्ण करताना माझीच दमछाक होते, अशी प्रामाणिक कबुली कर्णधार रोहित शर्माने दिली.

सिराज तर लय मागे लागतो!
वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला आवरणे तर मोठे कष्टाचे काम असते. गोलंदाजी घेण्यासाठी तो मागे लागतो. त्रिवेंद्रममध्ये एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेला ‘टीम इंडिया’ने केवळ 22 षटकांत गारद केले होते. सिराजने 22 पैकी 10 षटके एकटय़ाने टाकली. त्याला त्या सामन्यात 4 विकेट मिळाल्या होत्या. मला 5 विकेट पाहिजे म्हणून तो लगेच गोलंदाजी मागायचा. मी त्याला म्हटले, अरे ऑस्ट्रेलियाविरुद्ध महत्त्वाची कसोटी मालिका आहे. आताच इतकी गोलंदाजी टाकू नको. उगाच रिस्क कशाला? मात्र तो काही ऐकत नव्हता, असा किस्साही रोहित शर्माने सांगितला.